Sahil Wakode Case pudhari photo
मुंबई

Sahil Wakode Death Case : साहिल मृत्यू प्रकरणी विद्यार्थी, राजकीय संघटना देणार संघटित लढा

कृती समिती स्थापन; प्रा. दुल्ला यांच्या अटकेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी समविचारी विद्यार्थी व राजकीय संघटनांनी एकत्र येत संयुक्त कृती समितीची स्थापना केली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, कथित संभाषण आणि कथित माफीनामा टप्प्याटप्प्याने प्रसारमाध्यमांमध्ये फोडून जनमतावर प्रभाव टाकल्याचा आरोपही कृती समितीने केला आहे.

या संयुक्त कृती समितीमध्ये ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), एआयआयएससीए, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्टुडंट्स युनियन (मासू), सम्यक विद्यार्थी आंदोलन, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, आंबेडकराइट स्टुडंट्स असोसिएशन (एएसए), डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), एसएफआय, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा), भीम आर्मी व भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि समविचारी राजकीय संघटना सहभागी झाल्या आहेत.

संयुक्त कृती समितीने प्रा. दुल्ला यांच्या अटकेसाठी ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित विद्यार्थ्याचे कथित चरित्रहनन आणि तपासाशी संबंधित माहितीची गळती याला समितीने विरोध दर्शवला आहे. तसेच, पोलिसांनी केलेल्या कथित अनधिकृत स्थानबद्धतेच्या कारवाईला कायदेशीर आव्हान देण्याची भूमिका समितीने घेतली आहे.

चैत्यभूमीवर रविवारी मोर्चा

विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांच्या एकजुटीतून व्यापक आंदोलन, निदर्शने आणि कायदेशीर लढा उभारण्याचा कृती समितीने निर्धार व्यक्त केला. याचाच एक भाग म्हणून रविवारी संध्याकाळी ६ वाजता अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघातर्फे चैत्यभूमी येथे मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT