मुंबई: कुठलेही तंत्रज्ञान हे क्रिकेटपटूच्या तयारीला पूरक ठरावे. परंतु, मैदानावर निर्णय घेताना ते कधीही अडथळा ठरू नये, असे मत विक्रमवीर सचिन तेंडुलकरने मुंबईमध्ये आयोजित इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या (आयएसपीएल) चौथ्या हंगामाच्या खेळाडूंच्या लिलावाच्या निमित्ताने रविवारी व्यक्त केले.
तंत्रज्ञान हे एक साधन असावे, अडथळा नको. सराव करताना त्याचा वापर करा, पण तुम्ही मैदानात उतरता, तेव्हा तुमच्या नैसर्गिक उपजत बुद्धीवर विश्वास ठेवा आणि तुमच्या अवचेतन मनाला निर्णय घेऊ द्या. क्रिकेटमध्ये, गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी धावत येतो, तेव्हा फलंदाजाकडे माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी खूप कमी वेळ असतो.
तुमच्याकडे रणनीती असू शकते, परंतु मैदानात उतरल्यावर मन शांत ठेवणे आणि स्वतःच्या उपजत प्रतिसादावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असते. तंत्रज्ञान एका मर्यादेपर्यंत मदत करू शकते, परंतु शेवटी तुम्हाला स्वतःवरच विश्वास ठेवावा लागतो. तेव्हाच तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकता, असे सचिनने सांगितले.
आयएसपीएल कोअर कमिटीचे सदस्य असलेल्या तेंडुलकरने यावेळी, तंत्रज्ञान आणि नैसर्गिक उपजत बुद्धी यांच्यात योग्य समतोल राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तरुण क्रिकेटपटूंना खेळाचा आनंद लुटण्यावर भर देण्याचाही सल्ला दिला. लिलावाच्या वेळी आयएसपीएल कोअर कमिटीचे सदस्य, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, सचिन तेंडुलकर, मीनल अमोल काळे, सूरज समत तसेच सिलेक्टर जतिन परांजपे आणि प्रवीण आम्रे उपस्थित होते. यासोबतच टायगर्स ऑफ कोलकाता फ्रँचायझीचे सह-मालक सैफ अली खान आणि करीना कपूर खान देखील उपस्थित होते.
तळागाळातील संधींच्या महत्त्वावर भर देत तेंडुलकरने देशभरातील उदयोन्मुख प्रतिभा शोधण्यात आणि त्यांना घडवण्यात आयएसपीएलच्या भूमिकेवरही भाष्य केले. प्रतिभा ही वाहत्या पाण्यासारखी असते. तुम्ही तिला काही काळासाठी रोखून धरू शकाल, पण कायमचे अडवू शकत नाही. खेळाडू मोठ्या शहरातून असो किंवा अगदी छोट्या गावातून, प्रतिभा आपला मार्ग शोधून काढतेच.
आयएसपीएलमध्ये आम्ही निवड प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असावी, जिथे कामगिरीला योग्य मोबदला मिळेल, याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे सचिन म्हणाला. आयएसपीएलच्या तिसऱ्या हंगामात सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवणाऱ्या विवेक शेलारचे उदाहरण यावेळी तेंडुलकरने दिले.