Girls Polytechnic Admission Pudhari
मुंबई

Girls Polytechnic Admission: ड्रेस डिझायनिंग सोडून मुलींची कॉम्प्युटर, ‘एआय’ला पसंती!

पॉलिटेक्निकमध्ये बदलतोय गावखेड्यांतील मुलींचा ट्रेंड

पुढारी वृत्तसेवा

पवन होन्याळकर

मुंबई: दहावीनंतर मुलींची पसंती आता ‘ड्रेस डिझायनिंग’, ‘मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी’सारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी ‘कंप्युटर इंजिनिअरिंग’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग’सह आधुनिक शाखांकडे वळली आहे.

गेल्या दहा वर्षांतील पॉलिटेक्निक प्रवेशाच्या आकडेवारीतून हा बदल स्पष्ट ‍दिसत आहे. विशेष म्हणजे, अनेक आधुनिक आणि कोअर इंजिनिअरिंग शाखांमध्ये ग्रामीण विद्यार्थिनींची संख्या शहरी विद्यार्थिनींपेक्षा अधिक आहे.

राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या २०१७-१८ ते २०२६-२७ या दहा वर्षांच्या आकडेवारीनुसार राज्यातील दहावीनंतर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींच्या अभ्यासक्रम निवडीत मोठे बदल दिसून येत आहेत.

दशकभरापूर्वी मुलींच्या पसंतीक्रमात हमखास असणारे 'ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग' तसेच 'मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी' हे अभ्यासक्रम आता टॉप टेनमधून पूर्णपणे हद्दपार झाले आहेत.

जागतिक बाजारातील रोजगाराच्या संधी ओळखून ग्रामीण मुलींनी थेट कोडिंग, अल्गोरिदम आणि नवतंत्रज्ञानाशी जोडल्या गेलेल्या शाखांना अधिक पसंती देत आहेत.

गेल्या २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ग्रामीण भागातून कंप्युटर इंजिनिअरिंग’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या २ हजार ६८८ इतकी होती २०२६-२७ शैक्षणिक वर्षात ही प्रवेशाची संख्या ७ हजार २५३ वर पोहोचली आहे.

म्हणजेच दहा वर्षांत ग्रामीण मुलींच्या प्रवेशात जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. तर शहरी भागातील ३ हजार २१४ मुलींनी कंप्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आहे.यामुळे मागणी असलेल्या या कंप्युटर शाखेत ग्रामीण मुलींचा टक्का शहरापेक्षा दुपटीहून अधिक आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने पुढे आलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग’ शाखेकडेही ग्रामीण मुली मोठ्या प्रमाणात वळल्या असून या अभ्यासक्रमासाठी २०२२-२३ मध्ये ग्रामीण भागातील अवघ्या १५७ मुलींनी प्रवेश घेतला होता.

यंदा हा आकडा २ हजार १९५ वर पोहोचला तर शहरी भागातील १ हजार ३१३ विद्यार्थिनींनी या शाखेत प्रवेश घेतला आहे. प्रवेशातही मोठी वाढ झाली आहेच याबरोबरच ग्रामीण मुलींची संख्या शहरी मुलींपेक्षा अधिक आहे.

यापूर्वी मुलींच्या पसंतीक्रमात ड्रेस डिझायनिंग आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीसारखे अभ्यासक्रम होते. मात्र त्या ऐवजी आता एआय-एमएल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कंप्युटर आणि इतर तंत्रज्ञानाधारित शाखांना मुलींचा कल अधिक पहायला मिळत आहे.

उद्योगांचाही मुलींना रोजगार देण्याकडे कल

केवळ सॉफ्टवेअर आणि नव्या तंत्रज्ञानाच्या शाखांत हे प्रवेश झालेले नाहीत तर प्रामुख्याने मुलांचे वर्चस्व मानल्या जाणाऱ्या कोअर इंजिनिअरिंग शाखांमध्येही ग्रामीण मुलींची संख्या लक्षणीय वाढत आहे.

२०२६-२७ मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ३ हजार ३७, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये २ हजार ७३४ आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये १ हजार ८३९ ग्रामीण भागातील मुलींचे प्रवेश झाले आहेत.

यामुळे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या विविध शाखांमध्ये त्यांचा वाढता आत्मविश्वासही वाढला आहे. गेल्या चार वर्षांत प्रामुख्याने एआय अँड मशीन लर्निंग, कंप्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांत प्रवेश अधिक आहेत.

त्यासोबतच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या शाखांमध्येही ग्रामीण मुलींच्या प्रवेशात वाढ झाली आहे.

मुलींच्या पॉलिटेक्निक प्रवेशवाढीमागे केवळ एका कारणाचा वाटा नाही. शुल्कमाफी व शिष्यवृत्ती, ग्रामीण भागात वाढलेल्या वसतिगृह सुविधा, पालकांच्या बदललेल्या मानसिकतेसोबतच इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या वाढलेल्या संधी यामुळे मुलींचा तंत्रशिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. उद्योगांचाही मुलींना रोजगार देण्याकडे सकारात्मक कल वाढला आहे. त्यामुळे आज ग्रामीण भागातील मुली पारंपरिक शाखांपुरत्या मर्यादित न राहता कॉम्प्युटर, एआय-एमएलसह कोअर इंजिनिअरिंगच्या शाखांमध्येही आत्मविश्वासाने प्रवेश घेत आहेत.
- डॉ. अतुल बोराडे,प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT