मुंबई : श्रीकांत जाधव
व्यवहारापुरते मराठी भाषा शिकण्याची मुदत संपल्यापासून परिवहन विभागाकडून मराठी येत नसलेल्या अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांची कडक तपासणी सुरू आहे. पहिल्याच दिवशी आरटीओने ४१० चालकांना नोटिसा बाजवल्या आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या लाखो रिक्षा-टॅक्सी चालकांनी काम बंद करून मराठी भाषा वर्गाकडे धाव घेतली आहे.
मात्र, गेल्या १३ दिवसांपासून चेंबूर, कुर्ला, दादर, परेल, वडाळा, अंधेरी, जागेश्वरी आणि गिरगाव अशी सर्वच प्रशिक्षण केंद्र बंद आहेत. त्यात आरटीओकडून कारवाई म्हणून एक महिन्याची नोटिस दिली गेल्यापासून केंद्रच सुरू नसल्याने काहींचे १२ ते १३ दिवस प्रशिक्षणापासून वाया गेले आहेत.
अशा अवस्थेत मराठी शिकायचे कुठे? आणि कारवाई टाळायची कशी ? याच्या विचारात काही रिक्षा-टॅक्सी चालकांनी काम बंद करून गावी जाणे किंवा दुसऱ्या व्यवसायाकडे धाव घेतली आहे. दरम्यान, २० ऑगस्टपासून रिक्षा-टँक्सी चालकांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या परिवहन विभागाला शासनाचे मराठी भाषा वर्ग १५ ऑगस्टपासून बंद असल्याचा विसर पडल्याचे चित्र सर्वत्र आहे.
अमराठी रिक्षा-टँक्सी चालकांना व्यवहारापुरते मराठी यावे म्हणून मोठा गाजावाजा करीत शासनाने मुंबईत १६५ ठिकाणी मराठी उजळणी केंद्र सुरू केली होती. मात्र गेल्या १५ ऑगस्टच्या रात्रीपासून हे वर्ग बंद झाले आहेत. शिवाय २० ऑगस्टपासून आरटीओकडून मराठी येत नसलेल्या रिक्षा-टँक्सी चालकांवर कारवाई केली जात आहे.
मराठी येत नसलेल्या रिक्षा-टँक्सी चालकांना नोटीस देत एक महिन्याची मुद्दत दिली जात आहे. मात्र,नोटीस हाती आल्यापासून मराठी शिकण्यासाठी रिक्षा-टँक्सी चालकांना मुंबईत कोठेच मराठी वर्ग सुरु नाहीत. त्यामुळे आरटीओची कारवाई टाळण्यासाठी काही रिक्षा-टँक्सी चालकांनी काम बंद केले आहे. तसेच काही रिक्षा-टँक्सी चालकांनी लायसन्स जप्त होईल या भीतीने दुसऱ्या व्यवसायाकडे धाव घेतली आहे.
मुंबईत सर्व ठिकाणी वर्ग बंद ...
अमराठी रिक्षा-टॅक्सी वाहनचालकांसाठी शासनाच्या पुढाकाराने १ मे पासून जवळपास १६५ 'व्यवहारिक मराठी शिकवणी' वर्ग सुरू करण्यात आली होती. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याकडे शिकवणी वर्गाची जबाबदारी होती. चेंबूर,कुर्ला,दादर, परेल,वडाळा,अंधेरी,जागेश्वरी आणि गिरगाव येथे मोठ्या जोशात हे वर्ग सुरू होते. मात्र १५ ऑगस्टच्या रात्रीपासून या वर्गाची मुदत संपल्यामुळे ती बंद आहेत. पुढील सूचना येईपर्यत हे वर्ग बंद असणार असल्याचे आरटीओच्या कारवाईनंतर केंद्रावर मराठी शिकण्यासाठी जात असलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांना सांगण्यात येत आहे.
२५ हजार ७०७ चालक मराठी भाषा वर्गापासून वंचित
राज्य शासनाने अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा वर्ग सुरू केल्यापासून १ लाख ६६ हजार १३४ अर्ज आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार ४२७ रिक्षा-टॅक्सी चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. उर्वरित २५ हजार ७०७ प्रशिक्षणार्थी शिकवणी वर्गाला गैरहजर राहणे, परीक्षेच्या दिवशी उपस्थित नसणे, काही परीक्षेत नापास होणे अशा कारणांमुळे परीक्षा पूर्ण करू शकलेले नाहीत.
या २५ हजार ७०७ रिक्षा टँक्सी चालकांसाठी सध्या मुंबईत कोठेच वर्ग सुरू नाहीत. शिवाय ज्या अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर आरटीओकडून नोटीस कारवाई होत आहे. त्यानाही सध्या वर्ग नाहीत. मात्र नवीन वर्ग सुरु करण्यासाठी येत्या १ सप्टेंबर रोजी बैठक होणार असल्याचे शासनाच्या मराठी भाषा वर्गाच्या समनव्यक ज्योती ठाकरे यांनी सांगितले.
नोटिसीचे १३ दिवस वाया
आरटीओच्या भरारी पथकाकडून पहिल्याच दिवशी मराठी येत नसलेल्या ४१० चालकांना नोटिसा देण्यात दिल्या आहेत. ३० सप्टेंबर पर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. मात्र ज्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना मराठी शिकण्यासाठी वर्गच नसल्याने नोटिसांचे १२ ते १३ दिवस वाया जात आहेत. २० तारखेला नोटिस बजावलेल्या ४१० चालकांची मराठी वर्गासाठी धावाधाव सुरू आहे.
नवीन २१ केंद्र सुरू होणार
विविध कारणांनी प्रशिक्षण पूर्ण न करू शकलेले २५,७०७ रिक्षा-टँक्सी चालक गेल्या १५ ऑगस्टपासून मराठी शिकवणीपासून वंचित आहेत.
अशात आरटीओकडून कारवाई सुरू असल्याने अमराठी रिक्षाटॅक्सी चालकांनी काम बंद करून मराठी वर्गाकडे धाव घेतली आहे. मात्र, १६५ वर्गांपैकी एकही वर्ग सध्या सुरू नसल्याने अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांची इकडे आड तिकडे विहिर अशी अवस्था आहे.
येत्या १ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि नवीमुंबई असे मिळून २१ नवीन मराठी वर्ग सुरू करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.