मुंबई

Rohit Pawar Vs BJP : ‘रोहित पवार म्हणजे प्रसिद्धीची हाव असलेले हावरट व्यक्तिमत्त्व’, भाजपचे प्रत्युत्तर, ‘त्या’ फोटोवरून खळबळ

"रोहित पवारांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मातीत घातली"; भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची एक्स पोस्टद्वारे टीका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रवक्ते नवनाथ कमल उत्तमराव बन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार हे प्रसिद्धीची हाव असलेले व्यक्तिमत्त्व असून, स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे महत्त्व कमी करण्यासाठीच त्यांनी हा खटाटोप केला आहे, असा गंभीर आरोप नवनाथ बन यांनी आपल्या 'एक्स' हँडलवरून केला आहे. तसेच, या आरोपांबाबत खुद्द शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नवनाथ बन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रोहित सिंग आणि त्यांची 'व्हीएसआर' (VSR) कंपनी २०१३ पासून विविध राजकीय पक्षांना आणि राज्य सरकारला विमान सेवा पुरवत आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नव्हे, तर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या विमानाने प्रवास केला आहे. या व्यावसायिक संबंधांमुळे केवळ रोहित सिंगच नव्हे, तर अनेक वैमानिकांसोबत सर्वच नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत.

अशा परिस्थितीत एखाद्याच्या लग्नसमारंभाला उपस्थित राहणे ही अत्यंत सामान्य बाब असून, अनेक नेत्यांचे वैमानिक आणि सहवैमानिकांसोबतचे फोटो उपलब्ध आहेत. मात्र, केवळ एका फोटोच्या आधारावर असे आरोप करणे हे अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण असल्याची टीका बन यांनी केली आहे. रोहित पवार यांनी आज जे कृत्य केले, त्यातून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे संस्कार आणि महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीला मातीत घातले आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा निषेध नोंदवत, रोहित पवारांच्या या विधानांशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सहमत आहे का, याबाबत पक्षाने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तातडीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही नवनाथ बन यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT