रोहित पवारांनी आपल्‍या फेसबूक पोस्‍टवर लिओनेल मेस्सीसोबतचा फोटो शेअर केला आहे. Pudhari
मुंबई

Rohit Pawar Post : "विचारांचा मार्ग संघर्षाचाच, तिथं शॉर्टकट नसतो..."; मेस्सीचा फोटो शेअर करत रोहित पवारांचा 'कोणाला' टोला?

स्वाभिमानाने संघर्ष करण्याची इच्छा असलेल्यांनी आपले रोल मॉडेलही त्याच क्षमतेचे ठेवले पाहिजेत

पुढारी वृत्तसेवा

Rohit Pawar Facebook Post : मागील महिन्‍यात ठाकरे शिवसेनेच्या ६ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. यानंतर आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) विलीनीकरण होणार किंवा ते पाठिंबा देणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज (दि. १६) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर केलेली एक सूचक पोस्ट चर्चेत आली आहे.

मेस्सीच्या कामगिरीचे कौतुक करत संघर्षावर भाष्य

रोहित पवारांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिओनेल मेस्सीचा एक फोटो शेअर करत त्याच्या खेळाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले, "माझ्या ठराविक फेव्हरेट प्लेअर्सपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सी याने ज्या पद्धतीने इंग्लंडला पराभूत करून ‘फिफा वर्ल्ड कप २०२६’ च्या उपांत्य सामन्यात अर्जेंटीनाला लाजवाब विजय मिळवून दिला, ते पाहून पुन्हा एकदा सिद्ध झालं की 'Age is just a number...' त्याची मैदानावरील चित्त्यासारखी चाल कमालीची कौतुकास्पद होती. एक क्षण इंग्लंडच्या हाती गेलेला विजयाचा घास आपल्या झुंजार आणि लढाऊ बाण्याने त्याने अक्षरशः खेचून आणला."

'विचारांच्या मार्गात शॉर्टकट नसतो!'

सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना रोहित पवारांनी म्हटलं आहे की, "सद्यस्थितीत यातून सर्वांनीच बोध घेतला पाहिजे की, विचारांचा मार्ग हा संघर्षाचाच असतो, तिथं शॉर्टकट नसतो. पण एकदा टार्गेट फिक्स करून प्रामाणिकपणे संघर्ष केला तर यश तुमच्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही... आणि त्यासाठी कुणापुढं झुकण्याची तर बिलकूलच गरज नाही. त्यासाठी स्वाभिमानाने संघर्ष करण्याची इच्छा असलेल्यांनी आपले रोल मॉडेलही त्याच क्षमतेचे ठेवले पाहिजेत," असे सूचक आवाहनही रोहित पवारांनी केले आहे.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एकीकडे ठाकरे गटात झालेली पडझड आणि दुसरीकडे जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण, या पार्श्वभूमीवर रोहित पवारांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. स्वाभिमानाने संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी नेमकं कोणाला केलंय, यावर राजकीय वर्तुळात खल सुरू झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT