मुंबई

Rohit Pawar | "आमच्या कुटुंबातील माणूस गेला..." : विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात डीसीपी प्रणीव मुंडेंबरोबर शाब्दिक चकमक

पुढारी वृत्तसेवा

Rohit Pawar FIR demand

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी संबंधित विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी आज दि.२५ मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी रोहित पवार आणि पोलीस उपायुक्त (DCP) प्रणीव मुंडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.

तत्‍काळ गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी

अजित पवार यांच्‍या विमान अपघात प्रकरणी गुन्‍हा दाखल करावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्‍यात गेले. विमान अपघाताबाबत सर्व पुरावे उपलब्ध असतानाही पोलीस संबंधित कंपनीवर कारवाई का करत नाहीत? असा सवाल करत रोहित पवारांनी DGCA आणि व्हीएसआर (VSR) विमान कंपनीविरोधात तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी केली.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा

रोहित पवार आणि अमोल मिटकरी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिला. यामुळे वातावरण अधिकच तापले. पोलिसांशी संवाद साधताना रोहित पवार भावूक आणि संतप्त झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, "पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला साधे अर्ज द्यायचे नाहीत, आम्हाला थेट गुन्हा नोंदवायचा आहे. आमच्या कुटुंबातील माणूस गेला आहे, आमचे काका गेले आहेत. मग यंत्रणा गप्प का?" पोलिसांनी प्रतिसाद न दिल्यास बारामती पोलीस स्टेशनसमोर 'ठिय्या आंदोलन' करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पोलीस उपायुक्त मुंडेंशी बाचाबाची

पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. "गुन्हा दाखल करण्यासाठी एवढ्या लोकांची पोलीस ठाण्यात गरज नाही," अशी भूमिका डीसीपी प्रणीव मुंडे यांनी घेतली. यावरून रोहित पवार आणि मुंडे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या शाब्दिक चकमकीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

DGCA वर गंभीर आरोप

पोलीस ठाण्यात उपस्थित नेत्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. "राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो, आमच्याकडे या प्रकरणात घातपाताचे स्पष्ट पुरावे आहेत, तरीही पोलीस टाळाटाळ का करत आहेत? आम्हाला केवळ आश्वासने नकोत, तर ठोस कारवाई हवी," असे रोहित पवार यांनी पोलिसांना सुनावले. विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.रोहित पवारांनी केवळ कंपनीवरच नाही तर थेट नियामक संस्थेवरच गंभीर आरोप केले. २८ जानेवारीला ज्या दिवशी शवविच्छेदन सुरू होते, त्याच दिवशी DGCA ने अहवाल सादर करून VSR कंपनीला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला. विमानाचे 'एअर वर्दीनेस सर्टिफिकेट' (उडण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र), एअर सेफ्टी आणि फ्लाईट ऑपरेशन्समध्ये गंभी त्रुटी होत्या, तरीही विमानाला परवानगी कशी मिळाली? आमचा नेता गेल्यावर आता यंत्रणा त्रुटी असल्याचे सांगत आहेत, हे आधी का तपासले गेले नाही?" असा सवाल पवारांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT