Rohit Pawar
मुंबई : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेकीच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, आमदार रोहित पवार यांनी हा केवळ शाईफेकीचा प्रकार नसून प्रवीण गायकवाड यांच्या हत्येचा कट होता, असा गंभीर आरोप केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "ही झुंडशाही आहे. या झुंडशाहीच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांना मारण्याचा कट होता. दीपक काटे नावाच्या व्यक्तीकडे बंदूक होती, अशी माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य लोकांसमोर आले पाहिजे." रोहित पवार यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. "गायकवाड यांना मारण्याचा कट रचणारा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली. "दीपक काटे याने स्वतःच्या भावाची हत्या केली असून तो तुरुंगातही जाऊन आला आहे. त्याच्या आई-वडिलांनीही त्याला स्वीकारलेले नाही. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला भाजपने पद कसे दिले?" असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.