Mumbai Children Hostage pudhari photo
मुंबई

Mumbai Children Hostage : मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी रंगीत तालीम ?

रोहित आर्यने मुलांना घेऊन चित्रपटाप्रमाणे प्रसंग चित्रित केल्याची माहिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सतरा अल्पवयीन मुलांसह दोन वयोवृद्धांना ओलीस ठेवण्यापूर्वी रोहितने सदरचे कृत्य करण्यासाठी चित्रपटाप्रमाणे एक सीन केल्याचे बोलले जाते. त्यासाठी त्याने ऑडिशनसाठी मुलांना बोलाविण्यासाठी एका प्रॉडक्शन टीमला हायर केले होते. त्यासाठी या टीमकडून स्टुडिओजवळ पोस्टर लावण्यात आले होते. सर्व मुले आत आल्यानंतर हॉल आणि गेट बंद करण्यात आले होते. मुलांना वेबसीरिजमध्ये काम मिळत असल्याने अनेक पालकांनी ऑडिशनसाठी त्यांच्या मुलांना पाठविले होते, इतकेच नव्हे तर ते स्वत:ही ऑडिशनच्या ठिकाणी आले होते.

सुरुवातीला तीन दिवसांत ऑडिशनचे काम पूर्ण होईल असे वाटत असताना रोहितने आणखीन तीन दिवसांची मुदत मागून घेतली होती. या तीन दिवसांमध्ये रोहितने वेगवेगळ्या प्रकारचे चित्रीकरण मुलांकडून करून घेतल्याचे काही पालकांनी सांगितले. या तीन दिवसांत रोहितचे वागणे खटकावे असे काही घडले नव्हते, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र शेवटच्या दिवशी त्याने हे थरारनाट्य घडवले.

या ओलीसनाट्य थराराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीनंतर या घटनेमागील सत्य बाहेर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. रोहित आर्यला अशा प्रकारे कुठले पेमेेंट मिळणे बाकी होते का, त्याच्या कामाचे सर्वेक्षण करून त्याच्या दाव्याची पडताळणी केली जाणार आहे. या घटनेमागील अन्य काही कारण आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे. रोहित अशा प्रकारे काही कृत्य करणार होता, याबाबत त्याने कोणाला कल्पना दिली होती का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या संपूर्ण घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याचे बोलले जाते.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाने खबरदारीचा उपाय म्हणून पीआरटी किट, वेबर रेस्क्यू टूल्स तयार ठेवली होती. एमएफबीद्वारे एक लहान नळीची लाईन चार्ज ठेवण्यात आली होती. पहिल्या मजल्याची शिडी वरच्या मजल्याच्या खिडकीतून टाकून पोलिसांनी बाथरुमद्वारे आत प्रवेश मिळवला.

  • रोहित आर्यशी वारंवार संपर्क साधूनही तो बाहेर येत नव्हता. त्यामुळे विशेष पथकातील अधिकारी आणि कर्मचारी ॲक्शन मोडवर आले. यातील एका पथकाने बाथरूममधून प्रवेश करून रोहितला ताब्यात घेतले, असे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. ही एक आव्हानात्मक कारवाई केली. वाटाघाटीदरम्यान रोहितकडून लहान मुलांसह वयोवृद्धांना कुठलीही इजा होऊ नये म्हणून पोलिसांचे प्रयत्न होते. मात्र त्याच्याकडून कोणताही सकारात्मक संवाद नव्हता. त्यामुळे ओलीस ठेवलेल्यांना सुखरूप बाहेर काढणे हेच पोलिसांपुढे टार्गेट होते.त्यासाठी या पथकाने आपल्या जिवाची पर्वा न करता कारवाई करून रोहितला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, असेही दत्ता नलावडे यांनी सांगितले.

रोहितकडे एअरगनसह घातक केमिकल

  • रोहितकडे पोलिसांना एक एअर गन आणि काही घातक केमिकल सापडले आहे. त्याने घातक केमिकलने संपूर्ण स्टुडिओला आग लावण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याला ते एअर गन आणि घातक केमिकल कोणी दिले. ऑडिशनसाठी त्याने स्टुडिओ कधी, किती दिवसांसाठी बुक केला होता, हा स्टुडिओ कोणी बुक केला होता. स्टुडिओमध्ये कोणते ऑडिशन होते. मुलांना भीती वाटू नये म्हणून रोहितने त्यांना पिझ्झा आणि कोल्ड्रिंग मागविले होते. ते त्यांनी कोठून मागविले होते याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ओलीस नाट्य संपल्यानंतर फॉरेन्सिक टीमने संपूर्ण परिसराचा ताबा घेतला होता. घटनास्थळाहून काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

पुण्याहून चेंबूरमध्ये आला होता

  • रोहित आर्य हा मूळचा पुण्याचा रहिवासी होता. सध्या तो त्याच्या कुटुंबीयांसोबत चेंबूर परिसरात राहात होता. शाळेत असताना त्याने एक उपक्रम हाती घेतला होता. त्याचे एक डिझाईन तयार केले होते. त्याची सोशल मीडियावर काही अकाऊंट्‌‍स आहेत. त्याने कचऱ्याबाबत निष्काळजीपणामुक्त महाराष्ट्र असे इन्स्टाग्रामवर एक पेज सुरू केले होते. स्वच्छता मॉनिटर नावाने त्याने सिंधुदुर्ग येथील एका शाळेतील मुलांचा व्हिडीओ तयार करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्याचे स्वच्छतेबाबत काही व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आहेत.

रोहित मानसिक रुग्ण?

  • रोहित आर्य हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. त्याने मुलांना नेमके का डांबून ठेवले याबाबतची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. पवईतील रा स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. मुलांना या ठिकाणी ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. आत्महत्या करण्याऐवजी मी एक प्लॅन बनवला होता. माझ्या काही मोठ्या मागण्या नाहीत. माझ्या छोट्या मागण्या आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची मला उत्तरे हवी आहेत. यापलीकड़े मला काहीच नको आहे. मी दहशतवादी नाही. माझी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी नाही. मला संवाद साधायचा आहे. ज्यामुळे मी या मुलांना ओलीस ठेवले आहे. मी प्लॅन करुनच या मुलांना ओलीस ठेवले आहे. मी हे करणारच होतो. मी जिवंत राहिलो तर करेन नाहीतर मरेन,अशी माहिती रोहत आर्य या व्यक्तीने व्हिडीओ बनवून दिली आहे. या ठिकाणी आग लावून देण्याची धमकीदेखील त्याने दिली. माझं बोलणे झाल्यानंतर मी स्वत: बाहेर येणार आहे. मी एकटा नाही, तर माझ्याबरोबर खूप सारे लोक आहेत. अनेकांना खूप अडचणी आहेत.

ऑन दि स्पाॅट थरार...

1 जेव्हा मुलांनी स्टुडिओच्या खिडकीतून डोकावले, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला. मुले मदतीसाठी याचना करत होती. यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळातच स्थानिक पोलीस, एटीएस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसराला घेराव घातला. रोहित आतून पोलिसांना धमकावत राहिला, पोलिसांनी कारवाई केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देत राहिला.

2 दुपारी 1.45 वाजता स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला समजवण्यात अपयश आल्याने पोलिसांनी बाथरूममधून स्टुडिओमध्ये प्रवेश करून त्याला ताब्यात घेतले.

3 यादरम्यान आर्यने मुलांचा मानवी ढाल म्हणून वापर करत पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरात रोहितवर गोळीबार केला. या चकमकीत तो पोलिसांच्या गोळीने जखमी झाला. नंतर त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक एअर गन आणि काही रासायनिक पदार्थ जप्त केले. हे रासायनिक नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील. घटनास्थळी उपस्थित असलेले दिनेश गोस्वामी म्हणाले, गेल्या 3 दिवसांपासून येथे एक ऑडिशन सुरू होती. त्या व्यक्तीने (रोहित आर्य) ते आणखी तीन दिवसांसाठी वाढवले होते. अचानक एक मेसेज आला की, त्याने 17 मुलांचे अपहरण केले आहे.

जेव्हा ही मुले जेवणासाठी बाहेर आली नाहीत, तेव्हा पालक काळजीत पडले. कदाचित कोणीतरी पोलिसांना फोन केला असेल. जेव्हा पोलीस येथे पोहोचले, तेव्हा त्यांना कळले की, मुलांचे अपहरण झाले आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने आत जाऊन मुलांना सुखरूप बाहेर काढले. आता हा स्टुडिओ कायदेशीर आहे की बेकायदेशीर याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषी व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.

  • प्राथमिक तपासात रोहित हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे दिसून येत होते. त्याच्याकडे घातक शस्त्रे होती, असे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले. मुंबई पोलिसांना अग्निशमन दलाची प्रचंड मदत झाली होती. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे एक पथक तिथे रवाना झाले होते. या पथकाने हायड्रॉलिक साधनांनी बाथरुमचे ग्रिल्स कापून आत प्रवेश केला होता.

  • आरए स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी काही मुलांना वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी बोलाविण्यात आले होते. त्यामुळे काही पालक त्यांच्या मुलांना घेऊन तिथे आले होते. दुपारी सतरा अल्पवयीन मुलांसह दोन वयोवृद्धांना रोहित आर्यने ओलीस ठेवले होते. हा प्रकार बाहेर असलेल्या पालकांना समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ही माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नित्रंत्रण कक्षातून प्राप्त होताच पवई, साकीनाका पोलीस, जलद कृती दल, बॉम्बशोधक-नाशक पथक, अग्निशमन दलासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

रोहितला छातीत गोळी लागली

पोलिसांनी अनेकदा विनंती करूनही रोहितने आडमुठी भूमिका घेतली. त्याच्या ताब्यात मुले असल्याने पोलिसांनी सावध पावले उचलण्यास सुरुवात केली. मात्र तो चर्चेसाठी समोर येत नसल्याने एका पथकाने बाथरुमची खिडकी तोडून आत प्रवेश केला.

यावेळी ओलीस ठेवलेल्या सतरा मुलांसह दोन्ही वयोवृद्धांची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. या सर्वांना स्टुडिओबाहेर काढल्यानंतर सर्व मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. जवळपास एक तास पोलिसांनी रोहितशी संभाषण सुरू ठेवून ओलीस ठेवलेल्या मुलांसह इतर वयोवृद्धांना सोडण्याची विनंती केली होती. मात्र त्याने पोलिसांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोहीम हाती घेतली. जवळपास एक तास चाललेल्या या कारवाईत रोहितने पोलिसांच्या दिशेने त्याच्याकडील एअर पिस्तूलने गोळीबार केला.

पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याच्या छातीत गोळी लागली. जखमी झालेल्या रोहितला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी सव्वापाच वाजता त्याला डॉ. एम. एस बांगर यांनी तपासून मृत घोषित केले. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. रोहितच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.

रोहितचा सुनियोजित कट असल्याचा पोलिसांचा संशय

गुरुवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ओलीस ठेवलेल्या रोहित आर्य याचा अखेर मृत्यू झाला. रोहितने मुलांना ओलीस ठेवून त्याच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्याने आधीच काही योजना बनविल्या होत्या का, त्याचा सुनियोजित कट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या संपूर्ण कटाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

ऑडिशनसाठी रोहितने राज्यभरात काही मुलांना बोलाविले होते. त्यात मुंबईसह नवी मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली येथील मुलांचा समावेश आहे. गुरुवारी ऑडिशनचा अंतिम टप्पा असेल असे त्यांच्या पालकांना सांगण्यात आले होते.

ऑडिशनसाठी जास्तीत जास्त मुलांचा सहभाग असावा यासाठी त्याने कुठे जाहिरात केली होती का, त्यांनी सुरुवातीला काही मुलांना आणि नंतर दोन वयोवृद्धांना ओलीस ठेवले होते. त्यांच्या पालकांनाही ओलीस ठेवण्याचा त्याचा कट होता का याचा आता पोलीस तपास करत आहेत.

रोहितची समजूत काढण्यासाठी एका तरुणीच्या पालकांना पोलिसांनी तिथे बोलावून घेतले होते. मात्र या पालकांचेही रोहितने काहीही ऐकले नाही. जवळपास दोन ते अडीच तास पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता असे एकंदरीत पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी घटनास्थळावरुन पोलिसांना पुढील कारवाईचे आदेश दिले होते. पहिल्या मजल्यावर काही मुलांना ओलीस ठेवल्यानंतर काही मुले प्रचंड घाबरली होती. एक मुलगा रडत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पाहिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

नेमकं काय घडले?

  • आरए स्टुडिओमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलांसाठी ऑडिशन्स सुरू होती. युट्यूबर असल्याचा दावा करणारा रोहित आर्य नावाचा तरुण या ऑडिशन्स घेत होता. त्याने गुरुवारी सकाळी सुमारे 100 मुलांना ऑडिशन्ससाठी बोलवले होते. दुपारी 1 वाजेपर्यंत त्याने सुमारे 80 मुलांना घरी पाठवले. उर्वरित 17 मुलांना एका खोलीत बंद केले. जेव्हा मुले आवाज करू लागली आणि खिडक्यांमधून बाहेर डोकावू लागली तेव्हा लोकांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले आणि त्यांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मुंबई पोलिसांची अनेक पथके घटनास्थळी पोहोचली. स्टुडिओला घेराव घालण्यात आला आणि नाट्यमयरित्या बंदी बनवलेल्यांची सुटका करण्यात आली.

पोलिसांचे अभिनंदन - अतिशय विक्षिप्तपणे ज्या पद्धतीने बालकांना बोलावून ओलीस धरले. यात पोलिसांनी ज्या पद्धतीने नीट मोहीम पार पाडली त्याबद्दल खरोखरच त्यांचे अभिनंदन करतो. या मोहिमेत सर्व बालकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. ओलीस धरणारा आरोपी यात मृत्युमुखी पडला असून अन्य बाबींचा तपास सुरु आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर इतर तपशील सांगितले जातील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT