Rice Price Hike Pudhari
मुंबई

Rice Price Hike: वरणभातावर महागाईची धार! तांदळाच्या दरात ११ टक्क्यांची वाढ

कोलम तांदूळ ४५ ते ७० रुपये किलो; सणासुदीत मागणी वाढल्यास दर आणखी कडाडण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: विविध प्रकारच्या तांदळाच्या दरात गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील भातही महागला आहे.

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) बाजारात गेल्या महिन्याच्या तुलनेत तांदळाच्या घाऊक दरात सुमारे ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम आता किरकोळ बाजारावरही दिसून येत आहे.

घराघरांत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कोलम तांदळाचा घाऊक दर सध्या ४५ ते ७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. इंद्रायणी तांदळाचा दर ५० ते ७५ रुपये, तर आंबेमोहर तांदळाचा दर ८५ ते १२० रुपये प्रतिकिलो आहे. बासमती तुकडा आणि मोगरा तांदळाचे दरही वाढले असून, बासमती तुकडा ६० ते ७० रुपये, तर मोगरा ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

किरकोळ बाजारात दर आणखी वाढत असून, कोलम तांदळाचा दर ५५ ते ८५ रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. इंद्रायणीचा दर ६५ ते ९० रुपये, आंबेमोहर १०० ते १३५ रुपये, तर जाडा तांदूळ ३५ ते ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत विकला जात आहे. बासमती तुकडा आणि मोगरा तांदळाचे दरही घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळ बाजारात सरासरी १० ते १५ रुपयांनी अधिक आहेत.

तांदळाच्या दरवाढीमागे वाढलेली मागणी, काही राज्यांतून घटलेली आवक आणि निर्यातीमुळे निर्माण झालेला परिणाम ही प्रमुख कारणे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि इतर प्रमुख उत्पादक राज्यांतून होणाऱ्या आवकवरही बाजारातील दर अवलंबून आहेत.

आगामी सणासुदीच्या काळात तांदळाची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दरवाढीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT