-राष्ट्रीय अध्यक्ष,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती
-पश्चिम बंगाल, पाॅंडेचेरी मध्ये भाजपला पाठिंबा
-मिलिंद सुर्वे,जीवन जाधव यांचा प्रवेश
मुंबई: एप्रिल मध्ये होणाऱ्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकी मध्ये आसाम,तामिळनाडू व केरळ या तीन राज्यात रिपब्लिकन पक्ष निवडणूक लढवेल तर पश्चिम बंगाल व पाॅंडेचेरीमध्ये भाजपला पाठिंबा देईल,असा निर्णय रिपब्लिकन पक्षाने घेतल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.ते मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेस अविनाश महातेकर,गौतम सोनवणे,सिद्धार्थ कासारे,संजय पवार आदी उपस्थित होते.
देशात रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी व रिपब्लिकन पक्षाची एकजूट रहावी यासाठी छोटे पक्ष,गट व संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सहभागी व्हावे असेही आवाहन आठवले यांनी यावेळी केले.दरम्यान,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद सुर्वे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जीवन जाधव यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.
देशातील २८ राज्यात व आठ केंद्रशासित प्रदेशामध्ये रिपब्लिकन पक्षाचे काम सुरु आहे.मणिपूर व नागालँड या राज्यात रिपब्लिकन पक्ष पोहचवला आहे.आता आणखी दोन राज्यात पक्षाला मान्यता मिळाल्यास ४ राज्यात पक्षामान्यता मिळेल.त्यादृष्टीने आपले काम सुरु आहे.चार राज्यात मान्यता असणार्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते.रिपब्लिकन ऐक्यासाठी वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली भुमिका मांडून आपल्या सोबत यावे.आम्ही दोन पााऊल मागे घेण्यास तयार आहे.त्याचबरोबर छोट्या रिपब्लिकन गटांनी,पक्ष व संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सहभागी व्हावे,असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.
एप्रिल मध्ये होणाऱ्या ५ विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने गन्ना किसान हे चिन्ह दिले आहे.आसाम,तामिळनाडू व केरळ या ३ राज्यांत रिपब्लिकन पक्ष रिंगणात उतरवले आहेत. त्याठिकाणी काही जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार आहे.तसेच पाँडिचेरी व पश्चीम बंगाल मध्ये रिपब्लिकनचा भाजपला पाठिंबा असणार आहे.मुंबईतील पात्र झोपडपट्टी वासियांना पुनर्वसन प्रकल्पात महायुती सरकारने ४५० स्क्वेअर फुटाची घरे दिली पाहिजे,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.
नाशिक जिल्हयातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर रामदास आठवले म्हणाले,या प्रकरणाचा मी निषेध करतो.या प्रकरणाची एसआयटी व पोलीस सखोल चौकशी सुरु आहे.मी फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त आहे.आखाती देशातील युद्धाच्या स्थितीवर हे युद्ध थांबले पाहिजे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही युद्ध नको,त्यांना शांतता पाहिजे आहे.आतापर्यंत तीन वेळा लोकसभा व राज्यसभा तीनवेळा असे एकूण ६ वेळा खासदार झालो.मला पदे मिळाली असली तरी कार्यकर्त्यांसाठी एक विधानपरिषद,दोन ते तीन महामंडळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणार आहे.त्यांनी विधानपरिषद देतो,असे आश्वासन दिले आहे,असे प्रश्नाला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले.