मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमध्ये प्रसूती कळा सुरू झालेल्या एका महिलेला, एका जागरूक मुंबईकर तरुणाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रसूती करण्यास मदत केली. व्हिडिओ कॉलवर एका डॉक्टरने केलेल्या मार्गदर्शनामुळे ही प्रसूती यशस्वी झाली. या धाडसी तरुणाचे नाव विकास बेद्रे (वय 27) असून, त्याच्या धाडसी कृतीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंगळवारी (15 ऑक्टोबर) पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास कॅमेरामॅन असलेले विकास बेद्रे लोकल ट्रेनने प्रवास करत होते. गाडी राम मंदिर स्थानकाजवळ येत असताना बाजूच्या डब्यात अंबिका झा (वय 24) या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. अंबिका या विरार येथील रहिवासी असून त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या आणि भाची होती.
अंबिका यांना वेदना असह्य झाल्याचे पाहून बेद्रे यांनी त्वरित ट्रेनची आपत्कालीन साखळी खेचून गाडी थांबवली. बेद्रे यांनी लगेच त्यांच्या डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख यांना फोन केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन देविका देशमुख यांनी व्हिडिओ कॉलवर बेद्रे यांना प्रसूतीची प्रक्रिया कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. बेद्रे यांनी प्लॅटफॉर्मवरील चहाच्या स्टॉलवरून कात्री मिळवली आणि प्रसूतीसाठी काही चादरी जमा केल्या. डॉक्टरच्या मदतीने आणि बेद्रे यांच्या धाडसामुळे प्रसूती यशस्वी झाली.
अंबिका यांनी एका बाळाला (मुलगा) जन्म दिला. माता आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. बेद्रे यांनी सांगितले की, “मी खूप घाबरलो होतो, पण डॉ. देविकाच्या मदतीने मला धैर्य मिळाले. तिच्या मार्गदर्शनामुळेच मी प्रसूती यशस्वी करू शकलो.“ प्रसूतीनंतर महिलेच्या नातेवाईकांनी त्यांना एका खासगी रुग्णवाहिकेतून कूपर रुग्णालयात दाखल केले.या घटनेचा व्हिडिओ एका प्रत्यक्षदर्शीने सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामुळे बेद्रे यांचे रिअल-लाईफ रँचो म्हणून कौतुक होत आहे. या धाडसी कार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बेद्रे यांचा सत्कार केला.