Bank Loan EMI Pudhari
मुंबई

Home Loan EMI: घर घेण्याचे स्वप्न महागणार! रेपोदर वाढला; गृहकर्जाचा ईएमआय तब्बल ३ हजारांनी वाढण्याची शक्यता

शिल्लक गृहकर्जही महागाईच्या कात्रीत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपोदर ५.२५ वरून ५.५० टक्के करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व प्रकाच्या कर्ज व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ झाली आहे. परिणामी गृहकर्जाचा मासिक हप्ता कर्जानुसार पावणेचारशे रुपये ते तीन हजार रुपयांपर्यंत वाढेल. परिणामी नवीन सदनिका घेण्याचे स्वप्न महागणार असून, सध्याच्या शिल्लक गृहकर्जासाठीही अधिक पैसे मोजावे लागतील.

कर्जदारांना २०२५ वर्ष आनंददायी ठरले होते. आरबीआयने फेब्रुवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रेपोदरात १.२५ टक्क्यांनी कपात केली होती. त्यामुळे नागरिकांच्या खिशावरील ताण कमी झाला होता. पश्चिम आशियातील युद्धामुळे उडालेल्या तेल भडक्याने महागाई वाढल्याने आरबीआयने रेपोदरात पाव टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २५ लाख ते दोन कोटी रुपयांच्या २० वर्षे कालावधीच्या कर्जावर परिणाम होणार आहे.

सध्या ७.२५ टक्के दराने असलेले गृहकर्ज साडेसात टक्क्यांवर जाईल. त्यामुळे २५ लाख रुपये कर्ज शिल्लक असल्यास हप्ता ३८० रुपयांनी वाढून २०,१३९ रुपयांवर जाईल. तर, ५० लाख रुपयांच्या कर्जाचा हप्ता ७६० रुपयांनी वाढून ४०,२८० रुपयांवर आणि ७५ लाख रुपये कर्जाचा हप्ता १,१४१ रुपयांनी वाढून ६०,४१९ रुपयांवर जाईल.

तर, एक कोटी रुपयांच्या कर्जाचा हप्ता १,५२१ रुपयांनी वाढून ८०,५५९ रुपये होईल. त्याचप्रमाणे दोन कोटी रुपये कर्जाचा हप्ता ३ हजार ४३ रुपयांनी वाढून १ लाख ६१ हजार ११८ रुपये होईल.

तसेच, ज्या गृहकर्जदारांचा सध्याचा व्याजदर ७.७५ टक्के आहे. त्यांना आठ टक्के दराने व्याज लागेल. परिणामी २५ लाख रुपये कर्ज शिल्लक असल्यास मासिक हप्ता ३८७ रुपयांनी वाढून २० हजार ९११ रुपये होईल. तर, ५० लाख रुपयांच्या कर्जाचा हप्ता ७७४ रुपयांनी वाढून ४१,८२२ रुपयांवर जाईल.

तसेच, ७५ लाख रुपयांच्या कर्जाचा हप्ता १,१६१ रुपयांनी वाढून ६२,७३३ रुपये होईल. तर, एक कोटी रुपये कर्जाचा हप्ता १,५४९ रुपयांनी वाढून ८३,६४४ रुपये होईल. तर, दोन कोटी रुपयांच्या कर्जाचा हप्ता ३ हजार ९८ रुपयांनी वाढून १ लाख ६७ हजार २८८ रुपये होईल.

असा झाला रेपोदरात बदल

डिसेंबर २०२२ मध्ये ६.२५ टक्के रेपोदर होता. त्यात फेब्रुवारी २०२३मध्ये ६.५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली. हा दर डिसेंबर २०२४ पर्यंत स्थिर होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२५मध्ये रेपो दर पाव टक्क्यांनी घटून ६.२५ टक्के झाला.

एप्रिल २०२५मध्ये रेपोदर सहा टक्क्यांवर आला. जून २०२५ मध्ये अर्धा टक्क्यांची कपात होऊन रेपो दर ५.५० टक्क्यांवर आला. पुढे डिसेंबर २०२५मध्ये रेपोदर पाव टक्क्यांनी कमी करून ५.२५ टक्के करण्यात आला होता. म्हणजेच फेब्रुवारी २०२३नंतरची ही पहिलीच दरवाढ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT