Sanjay Raut
मुंबई : महायुतीच्या सभेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी परिधान केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या पेहरावाचा उल्लेख 'रसमलाई इफेक्ट' असा केला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये रवींद्र चव्हाण यांना डिवचताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. "गुडघ्याला मार लागलाय म्हणून लुंगी घातली का?" असा सवाल त्यांनी विचारला आहे. चव्हाणांना एखादा मोकळा-ढाकळा मराठी लेंगा घालता आला नसता का, असा टोलाही त्यांनी लगावला. चव्हाण यांनी केलेल्या या दाक्षिणात्य पेहरावावरून खासदार राऊत यांनी त्यांना लक्ष केले असून, सोशल मीडियावर ही 'रसमलाई इफेक्ट'ची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, रायगडची महत्वाची मराठी शहरे गुजरातला देण्याचा घाट या सरकारने घातला असून यासाठी अदानीला एजंट नेमले आहे. असा जोरदार हल्ला उद्धव आणि राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत केला. तुमची मराठी शहरे वाचवा आणि महापालिकेमधून या महायुतीला हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ठाणे गडकरी रंगायतनच्या समोर ठाकरे बंधुच्या शिवशक्तीची जाहीर प्रचार सभा झाली. याप्रचार सभेत व्यासपीठावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, माजी खासदार राजन विचारे, संजय राऊत, अविनाश जाधव, केदार दिघे आदी नेते उपस्थित होते.