मुंबई : सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा या मुद्द्यांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व शेतकऱ्यांनी गुरुवारी विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न करीत सातबाऱ्यांच्या प्रती विधान भवनात त्यांनी फेकल्या. तसेच सोयाबीन व कापूस उधळून सरकारचा निषेध केला.
शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकारने पाळला नसल्याचा आरोप तुपकर यांनी यावेळी केला. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
या परिसरात पोलीस फौजफाटा तैनात असतानाही तुपकर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत धडकले. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या’, ‘सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या’,‘सरकारने दिलेला शब्द पाळा’अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात आणले.
या आंदोलनाची दखल घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोन करून सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उच्चस्तरीय बैठक घेऊ, असे सांगितल्याचे तुपकर यांनी सांगितले.