Ravi Pujari Acquitted
मुंबई : गँगस्टर दाऊद इब्राहिमचा कथित हस्तक अनिल शर्माच्या हत्या प्रकरणात गँगस्टर रवी पुजारीला विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले.
1999 मध्ये शर्मा हत्याकांड घडले. 1992 मध्ये जेजे हॉस्पिटलमध्ये झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी शर्माची हत्या करण्यात आल्याचा सरकारी पक्षाचा दावा होता.
रवी पुजारीला गेल्या वर्षी प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आल्यानंतर हा पहिलाच खटला संपला. न्यायालयाने या प्रकरणातील इतर 11 आरोपींनाही आधीच पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. तसेच छोटा राजनचीही निर्दोष मुक्तता झालेली आहे.
सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, गँगस्टर छोटा राजनने अनिल शर्माला संपवण्याची सुपारी पुजारीला दिली होती. शर्माने जेजे हॉस्पिटलमध्ये अरुण गवळी टोळीच्या सदस्यांवर गोळीबार केला होता. 2 सप्टेंबर 1999 रोजी शर्माची जीप तेलीगल्ली क्रॉस लेनवर पोहोचली, त्यावेळी समोरून एका मारुती कारने त्याला अडवले आणि मागून एक ऑटोरिक्षा आली. मारुतीमधील तीन आणि ऑटोमधील दोघांनी शर्मावर अंदाधुंद गोळीबार केला होता. शर्माला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र उपचार सुरु करण्याआधी त्याला मृत घोषित करण्यात आले.
शर्माने त्याला छोटा राजनच्या टोळीकडून धोका असल्याचे वडिलांना सांगितले होते. छोटा राजन, रवी पुजारी आणि गुरु साटम यांनी गोळीबार करण्याचा कट रचल्याचेही शर्माने वडिलांना सांगितले होते. त्याच आधारे सरकारी वकिलांनी पुजारीला दोषी ठरवण्याची विनंती न्यायालयाला केली होती.