Ramdas Kadam Criticise Anil Parab :
शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांनी केलेल्या वैयक्तिक आरोपांवर पत्रकारांसमोर येऊन जोरदार हल्लाबोल केला आहे. कदम यांनी अनिल परब यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले असून, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्मशानभूमीत काय घडलं?
रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर अत्यंत धक्कादायक आरोप केला आहे. कदम यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रग्रहणाच्या रात्री, पौर्णिमेला, रात्री १२ वाजता कोळीवाड्याच्या स्मशान भूमीमध्ये अनिल परब यांच्यासारखीच कोणीतरी व्यक्ती आली होती. त्यांच्यासोबत एक बिल्डर गाडी घेऊन आला होता, ज्या गाडीतून एक बकरा आणण्यात आला होता. यावेळी दोन पूर्ण नंगे बाबा होते.
कदम यांचा आरोप आहे की, योगेश आणि रामदास कदम अशा दोघांची नावे घेऊन त्या बकऱ्याचा बळी देण्यात आला आहे. कदम यांनी परब उद्येशून म्हणाले, जर हे खरं असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे आणि त्यांनी यावर खुलासा करावा.
सीबीआय चौकशीची मागणी
अनिल परब यांनी माझ्यावर खोटे आरोप केले असल्याने, आता मी देखील न्यायालयामध्ये जाईन. परंतु त्याआधी, बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस का ठेवले होते, याची शासनाने सीबीआय चौकशी करावी.
याबाबत मी आज निर्णय घेतला असून, मी उद्या स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून लेखी मागणी करणार आहे. बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मला स्वतः सांगितले होते की 'कदम साहेब, असे असे झाले होते, आम्ही तपासणी करण्याची मागणी केली, पण तसे झाले नाही'. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल.
१०० टक्के दावा ठोकणार
अनिल परब यांनी १९९३ साली घडलेल्या माझ्या पत्नीच्या घटनेबाबत आरोप केल्याने मला खूप दुःख आणि वेदना झाल्या आहेत. मी या आरोपांवर न्यायालयात १०० टक्के दावा ठोकणार आहे.
कदम यांनी स्पष्ट केले की, १९९३ मध्ये त्यांची पत्नी स्टोव्हजवळ जेवण करत असताना साडी जळाल्याने आग लागली. मी माझ्या पत्नीला वाचवले होते. या घटनेवेळी बाळासाहेब ठाकरे स्वतः जसलोक हॉस्पिटलमध्ये आले होते. साहेबांनी डॉक्टरांची बैठक घेऊन माझ्या पत्नीला वाचवले होते.
नार्को टेस्टसाठी तयार
अनिल परब यांनी वैयक्तिक आरोप करताना माझी नार्को टेस्ट (Narkotest) करण्याची मागणी केली होती. यावर बोलताना कदम म्हणाले की, माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण उद्धव ठाकरे यांची देखील नार्को टेस्ट व्हावी.
उद्धव ठाकरेच 'नमक हराम'
उद्धव ठाकरे यांनी मला गद्दार आणि 'नमक हराम' म्हटले आहे. यावर रामदास कदम यांनी प्रतिप्रश्न करत म्हटले, उद्धव ठाकरेंनी आमचं नमक खाल्लं आहे, नमक हराम उद्धव ठाकरे आहेत. मी पक्षामध्ये, मातोश्रीमध्ये ४५ वर्षे काढली आहेत.
कदम यांनी उद्धव ठाकरेंना आवाहन केले की, या चमच्यांना बोलू न देता उद्धव ठाकरेंनी स्वतः बोलावे, अन्यथा मला नाईलाजाने या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल.
अंत्यदर्शनावेळी भांडलो
बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कला अंत्यदर्शनासाठी रुग्णवाहिकेतून (अॅम्बुलन्स) नेण्याचा प्लॅन होता. मात्र, त्यावेळी मी आतमध्ये जाऊन भांडलो आणि म्हणालो की, साहेब आमचे आहेत, आम्ही गपचूप अॅम्बुलन्समधून घेऊन जाऊ देणार नाही. त्यानंतर आम्ही ट्रक मधून पार्थिव घेऊन गेलो, असे कदम म्हणाले.
कदम यांनी जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावर आक्षेप घेतल्याचा उल्लेख करून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे या विषयावर वास्तव काय आहे, हे तपासावे लागेल असे सांगितले.