Ramdas Athawale Adopted Leopard Pudhari
मुंबई

Ramdas Athawale Adopted Leopard: रामदास आठवले यांनी दत्तक घेतलेल्या ‘सूर्या’ बिबट्याचा मृत्यू

गंभीर आजारपणामुळे ‌‘सूर्या‌’स्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आठ वर्षीय सूर्या बिबट्याचा रविवारी मृत्यू झाला. मूत्रपिंड व यकृताच्या गंभीर विकारांवर त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला.

केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सूर्याला दत्तक घेतले होते. यापूर्वी त्यांनी दत्तक घेतलेल्या पँथर या बिबट्याचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे नॅशनल पार्कमधील बिबट्यांच्या देखभालीवर प्रश्न निर्माण झाला असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रिपाइंचे दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे यांनी केली आहे.

सूर्याला सन 2018 मध्ये अहिल्यानगर वन विभागातून दोन महिन्यांच्या पिल्लाच्या स्वरूपात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. त्याचे संगोपन व पालनपोषण उद्यानामध्ये हस्तपालन पद्धतीने करण्यात आले होते. मागील आठ वर्षांपासून त्याच्यावर नियमित देखरेख व निगा राखण्यात येत होती, असा दावा नॅशनल पार्क प्रशासनाकडून करण्यात आला.

13 मे रोजी त्याच्या वर्तनामध्ये सूक्ष्म बदल आढळून आले. त्यानंतर करण्यात आलेल्या रक्त तपासण्यांत त्याच्या मूत्रपिंडाचे जुने व गंभीर स्वरूपाचे विकार तसेच यकृताच्या वाढलेल्या मूल्यांची नोंद झाली. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तत्काळ उपचार सुरू करण्यात आले होते.

मात्र 15 मेपासून त्याच्या प्रकृतीत आणखी बिघाड होत गेला. आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्य न झाल्याने 17 मे रोजी सूर्याने अखेरचा श्वास घेतला. अंतर्गत अवयवांमध्ये गंभीर बिघाड असूनही बिबट्याने आजाराची स्पष्ट लक्षणे अत्यंत उशिरा दर्शविली. जे वन्य प्राण्यांमध्ये सामान्यतः आढळून येते, असे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात अले.

‘सूर्या‌’च्या मृत्यूनंतर उद्यानातील वन्यजीवांच्या वैद्यकीय देखरेख, उपचार पद्धती आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या प्रकरणी स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (ओआयपीए), अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) आणि प्लांट ॲण्ड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी - मुंबई (पॉज-मुंबई) यांनी संयुक्तपणे केली आहे.

या संदर्भात संबंधित संस्थांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक तथा वनसंरक्षक आणि सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन (वन्यजीव) यांना अधिकृत निवेदन सादर केले आहे. उपलब्ध माहितीनुसार, ‌‘सूर्या‌’ हा मृत्यूपूर्वी सलग दोन दिवस अन्न ग्रहण करीत नव्हता.

मृत्यूवर अनेक प्रश्न

बिबट्याची प्रकृती खालावत असल्याची नोंद वेळेत घेण्यात आली होती का, त्याच्यावर कोणते उपचार करण्यात आले, उपचार प्रक्रियेदरम्यान नेमके काय घडले, तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि तयारी पुरेशी होती का, याबाबत सविस्तर माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.

नॅशनल पार्कात वर्षभरात 3 ते 4 बिबट्यांचा मृत्यू

सन 2026 मध्ये नॅशनल पार्कमधील 3 ते 4 बिबट्यांचा आजारपणासह इतर कारणांनी मृत्यू झाला आहे. यामुळे बिबट्यांवर उपचार आणि देखभाल करणाऱ्या यंत्रणेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT