Ramayana Trailer file photo
मुंबई

Ramayana Movie Controversy: रामायण चित्रपटाविरोधात मुलुंडमध्ये पोलिसांत तक्रार; नमित मल्होत्रा, नितेश तिवारींवर कारवाईची मागणी

प्रभू श्रीरामांचे अवमानकारक चित्रण आणि रावणाचे महिमामंडन केल्याचा हिंदु जनजागृती समितीचा आरोप; धार्मिक भावना दुखावल्याचा दावा.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ‘रामायण’ चित्रपटातून प्रभू श्रीरामांचे अवमानकारक चित्रण, रावणाचे महिमामंडन आणि मूळ वाल्मिकी रामायणाचा विपर्यास केल्याचा आरोप करत हिंदु जनजागृती समितीने चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याविरोधात मुलुंड पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि १९६ अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.

चित्रपटातील काही दृश्ये आणि संवादांमुळे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रामायण हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्याने त्यातील पूजनीय पात्रांचे चित्रण करताना धार्मिक भावनांचा विचार करणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.

शूर्पणखेचे नाक कापण्याच्या प्रसंगानंतर माता सीता लक्ष्मणाला स्त्रीचे रूप विद्रूप करण्याचा अधिकार नसल्याचे सुनावत असल्याचे, तसेच श्रीराम खर-दूषण यांची क्षमायाचना करत असल्याचे काल्पनिक प्रसंग चित्रपटात दाखवण्यात आल्याचा आरोपही समितीने केला आहे. त्याग आणि निष्ठेचे प्रतीक असलेल्या लक्ष्मणाचे उद्धट व गुरूजनांचा उपहास करणारे चित्रण करण्यात आल्याने पूजनीय पात्रांचे अवमूल्यन झाल्याचे समितीने तक्रारीत म्हटले आहे.

चित्रपटाची प्रत, पटकथा तपासण्याची मागणी

तक्रारीत चित्रपटाची संपूर्ण अधिकृत प्रत, पटकथा, संवाद आणि उपशीर्षके प्राप्त करून आक्षेपार्ह दृश्यांचे अचूक वेळांक नोंदवून पुरावे जतन करण्याची मागणी करण्यात आली आहे. मूळ वाल्मिकी रामायण आणि चित्रपटातील बदलांची तुलना करण्यासाठी रामायण अभ्यासक, संस्कृत तज्ज्ञ आणि धर्मशास्त्राच्या जाणकारांचे मत घेण्याची विनंतीही पोलिसांकडे करण्यात आली आहे.

रावणाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप

चित्रपटात रावणाला गरिबांना सोन्याची घरे देणारा, शोषितांचा तारणहार आणि महिलांच्या सन्मानाचा रक्षक म्हणून दाखवून त्याचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा समितीचा आरोप आहे.

याउलट, ताडका आणि खर-दूषण यांच्या राक्षसी सेनेसमोर प्रभू श्रीराम व लक्ष्मण घाबरून मागे हटताना, तर निशस्त्र रावण मोठ्या सेनेसमोर निर्भयपणे लढताना दाखवण्यात आल्याचा आक्षेप तक्रारीत नोंदविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT