मुंबई: सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे या रिक्त जागेसाठी त्यांचे चिरंजीव जय पवार यांच्यासह राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यात स्पर्धा आहे. याशिवाय साताऱ्यातील नितीन पाटील यांचेही नाव चर्चेत आले आहे.
राज्यसभा सदस्या सुनेत्रा पवार विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्याने त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
या रिक्त जागेवर जय पवार यांनी दावा सांगितला असला, तरी एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींकडे पक्षाची महत्त्वाची पदे आणि खासदार-आमदारकी गेल्यास पक्षात आणि राज्यात वेगळा संदेश जाईल. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा जय पवार यांच्या नावाला विरोध आहे.
यापूर्वीही त्यांना विधान परिषदेवर पाठवून आमदार करण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, पक्षाने झिशान सिद्दिकी यांची निवड केली.
सुनेत्रा पवार यांच्या निवडीवेळी राज्यसभेसाठी भुजबळ यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांचा झालेला पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला होता.
तसेच, पक्षाने ही बाब प्रतिष्ठेची केल्यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती. आता परिस्थिती बदलल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी छगन भुजबळ यांचे नाव पुढे आणले आहे.