

मुंबई: लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये परदेशी पर्यटकांसाठी राखीव असलेल्या तिकिटांवर भारतीय प्रवासी बेकायदेशीरपणे प्रवास करत असल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी मध्य रेल्वेने 121 प्रवाशांकडून 3 लाख 56 हजार 916 रुपये दंड म्हणून वसूल केले आहेत.
गाडी क्रमांक 12296 संघमित्रा एक्सप्रेसमध्ये 4 फेब्रुवारीला काही प्रवाशांना बेकायदेशीरपणे प्रवास करताना पकडण्यात आले होते. हे भारतीय प्रवासी परदेशी पर्यटकांसाठी अनिवार्य असलेली आवश्यक कागदपत्रे न बाळगता परदेशी प्रवासी कोट्याच्या तिकिटांवर प्रवास करत होते. वैध सहाय्यक कागदपत्रांशिवाय प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या बुकिंगमधील अनियमितता उघडकीस आल्यानंतर मध्य रेल्वेने परदेशी पर्यटक कोट्याच्या गैरवापराविरोधात मोहीम हाती घेतली आहे.
परदेशी पर्यटक कोट्याअंतर्गत भविष्यातील तारखांच्या बुकिंगचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. तपासणीत असे दिसून आले की, दिनांक 24 एप्रिल 2026 ते दिनांक 11 जून 2026 या कालावधीत परदेशी पर्यटक कोट्याअंतर्गत 31 गाड्यांसाठी मध्य रेल्वेचे 174 ओरिजिनेटिंग पीएनआर तयार करण्यात आले होते. या कोट्यातील तिकिटांची सत्यता पडताळण्यासाठी मध्य रेल्वे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून विशेष तपासणी करून घेतली.
या मोहिमेदरम्यान परदेशी कोट्याचा गैरवापर करून 39 पीएनआर बुक केल्याचे आढळून आले. एकूण 121 प्रवासी अनियमितपणे प्रवास करत असल्याने त्यांच्यावर प्रचलित नियमांनुसार शुल्क आकारण्यात आले आणि दंड म्हणून 3 लाख 56 हजार 916 रुपये वसूल करण्यात आले. त्या प्रवाशांना बर्थवर बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. हे बर्थ नंतर आरएसी किंवा प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना वाटप करण्यात आले.