Rajawadi Hospital Pudhari
मुंबई

Rajawadi Hospital: राजावाडी रुग्णालयात आरएमओची कमतरता; एका डॉक्टरवर ४०० ते ५०० रुग्णांचा भार

तातडीने अतिरिक्त मनुष्यबळाची गरज

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: घाटकोपर येथील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) यांची संख्या अपुरी असल्याने उपलब्ध डॉक्टरांवर रुग्णसेवेचा मोठा भार पडत आहे. एका डॉक्टरला दिवसाला तब्बल ४०० ते ५०० रुग्णांची तपासणी करावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी तर एका डॉक्टरने सुमारे ८०० रुग्णांची तपासणी केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला असून, तातडीने अतिरिक्त आरएमओ नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

राजावाडी रुग्णालयात घाटकोपरसह पूर्व उपनगरातील मोठ्या संख्येने रुग्ण येतात. बाह्यरुग्ण विभागात दररोज होणारी गर्दी लक्षात घेता वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुरेशी संख्या असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या उपलब्ध आरएमओंच्या तुलनेत रुग्णांची संख्या मोठी असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण पडत आहे.

विशेषतः सुट्टीच्या दिवशी मनुष्यबळाची कमतरता अधिक जाणवते. रविवारी एका डॉक्टरकडे तब्बल ८०० रुग्णांची जबाबदारी आल्याने रुग्ण तपासणीपासून उपचारापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एका डॉक्टरलाच सांभाळावी लागली. दररोज ४०० ते ५०० रुग्ण तपासण्याची वेळ येत असल्याने डॉक्टरांवरील ताणाबरोबरच रुग्णांना पुरेसा वेळ देणेही आव्हानात्मक ठरत आहे.

३९ आरएमओची आवश्यकता

रुग्णालयातील रुग्णसंख्या आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा विचार करता सुमारे ३९ आरएमओंची आवश्यकता असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अतिरिक्त आरएमओ उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, राजावाडी रुग्णालयात नुकतेच एकाच दिवशी तीन अर्भकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधा आणि रुग्णसेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांवरील वाढता कामाचा ताण कमी करण्यासाठी तातडीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT