

मुंबई: सणाच्या काळात मुंबईसह राज्यात ऑनलाइन डिलिव्हरीला वेग आला आहे खाद्यपदार्थ व विविध जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या ऑनलाइन मागणीत लक्षणीय वाढ होत असून वाढलेल्या मागणीचा थेट फायदा सामान्य गिग वर्कर्स यांना होत आहे.
या काळात त्यांच्या दैनंदिन उत्पन्नात सरासरी १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र आहे. घरगुती खरेदी, खाद्यपदार्थ, मिठाई,किराणा,कपडे,भेटवस्तू तसेच इतर वस्तूंच्या ऑनलाइन ऑर्डर्स मध्ये मोठी वाढ झाली आहे.
परिणामी विविध ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर डिलिव्हरीची मागणी वाढली असून ती पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने गिग वर्कर्स कार्यरत आहेत. विशेषतः सकाळ पासून रात्रीपर्यंत ऑर्डर्सचे प्रमाण वाढल्याने डिलिव्हरी रायडर्स यांना नेहमीपेक्षा अधिक ट्रिप्स मिळत आहेत. ऑर्डरचे प्रमाण वाढल्याने प्रोत्साहन, इन्सेन्टिव्ह मिळत आहे.
याचबरोबर ऑनलाइन मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम डिलिव्हरी कंपन्यांच्या व्यवसायावर झाला आहे. खाद्यपदार्थ व विविध वस्तूंच्या ऑर्डर्समध्ये वाढ झाल्याने या कंपन्यांची दैनंदिन उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे ग्राहकांच्या वाढत्या ऑनलाइन मागणीची पूर्ततेसाठी डिलिव्हरी नेटवर्क वर ताण वाढत असताना दुसरीकडे हजारो गिग वर्कर्ससाठी हा कालावधी अतिरिक्त उत्पन्नाचा ठरत आहे
कमाई करण्याची मोठी संधी उपलब्ध
सणाचा काळ हा गिग वर्कर्ससाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा महत्त्वाचा कालावधी ठरत आहे.वाढलेल्या ऑर्डर्समुळे अधिक डिलिव्हरी करता येत असल्याने नियमित कमाई बरोबरच प्रोत्साहन व इन्सेन्टिव्हच्या माध्यमातूनही उत्पन्न वाढण्याची संधी मिळत आहे.
सणाच्या काळात ऑर्डर्स वाढल्याने डिलिव्हरी काम निश्चितच वाढते. त्यामुळे नियमित दिवसांच्या तुलनेत कमाईमध्ये सरासरी १० ते २०टक्क्यांपर्यंत फरक पडतो आहे, असे गिग वर्कर्स क्षेत्रातील प्रतिनिधींनी सांगितले.
वाढलेल्या व्यवसायाचा योग्य व न्याय्य वाटा डिलिव्हरी रायडर्सना मिळण्याबरोबर त्यांच्या सुरक्षिततेची,योग्य मोबदल्याची आणि सामाजिक सुरक्षेची ही कंपन्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ.केशव क्षीरसागर, कामगार नेते.