Rajawadi Hospital  pudhari photo
मुंबई

Mumbai municipal hospital : राजावाडीतील ऑपरेशन थिएटरमध्ये घामाच्या धारा !

विशेष म्हणजे याचा सर्वाधिक ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णांना त्रास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर राजावाडी हॉस्पिटलमधील मुख्य ऑपरेशन थिएटरमधील वातानुकलीत यंत्रणेमध्ये वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या डॉक्टरांसह नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांच्या अंगातून अक्षरशः घामाच्या धारा वाहत आहेत. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक ऑपरेशनसाठी आलेल्या त्रास रुग्णांना होत आहे.

राजावाडी हॉस्पिटल येथील स्त्रीरोग शस्त्रक्रिया विभाग, नाक कान व घसा शस्त्रक्रिया विभाग, रिकव्हरी रूम, शल्य क्रियागृह येथे १२ वर्षापूर्वी वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली होती. याचे आयुर्मान संपले असल्यामुळे ही यंत्रणा वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे याचा त्रास गेल्या काही दिवसापासून डॉक्टरांसह नर्सेस व अन्य कर्मचारी यांना होत आहे.

अचानक बंद पडणाऱ्या वातानुकूलित यंत्रणेमुळे ऑपरेशन सुरू असलेल्या रुग्णांना सर्वाधिक त्रास होत आहे. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा बदलण्याची मागणी राजावाडी हॉस्पिटल प्रशासनाने केली होती. परंतु नवीन यंत्रणा बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यासह कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी लागणाऱ्या लांबलचक वेळामुळे आजही येथील डॉक्टर व रुग्ण हैराण आहेत.

दरम्यान राजावाडी हॉस्पिटल मधील वातानुकूलित यंत्रणा बदलण्यासाठी यांत्रिकी व विद्युत विभागाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात येणार आहे. त्यामुळे अजून किमान वर्षभर डॉक्टर व रुग्णांना उकाडा सहन करावा लागणार आहे.

यंत्रणा बदलण्याचा खर्च साडेतीन कोटी

हॉस्पिटलच्या मुख्य ऑपरेशन थिएटरमधील वातानुकूलित यंत्रणा बदलण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी साई कूल सर्विसेस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही यंत्रणा बसवण्यासाठी कंत्राटदाराला वर्षभराचा कालावधी देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT