Sanjay Raut
मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधुंची युती झालेलीच आहे. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली असून कोणताही संभ्रम नाही. फक्त घोषणा आज करायची की उद्या एवढाच विषय आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आज (दि. २३) माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी राऊत म्हणाले की, मुंबई आणि इतर पालिकेत कार्यकर्त्यांकडून सोबत काम करायला सुरुवात झाली आहे, तशा सूचना दिल्या आहेत. युती झाली आहे, फक्त जागावाटवपावर काल रात्री शेवटची भेट झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन फक्त घोषणा करायची बाकी आहे. नाशिकमध्ये चर्चा आटोपली आहे. पुणे, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी जागावाटप झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठी बहुल भागात जागा वाटपावरून तणाव आहे का? या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहे, आमच्यात कुठेही तणाव नाही. जागा कोणालाही जाऊदे, ते आमच्या युतीकडेच असतील. ज्या दिवशी वरळीच्या डोममध्ये दोन भाऊ एकत्र आले त्याच दिवशी युती झाली.
हा देश मुडद्यांचा नाही, आम्ही जिवंतपणे बोलत नाही. सर्व संविधानिक संस्था भाजपच्या पायाखाली चिरडल्या जातील, त्यामुळे नंतर असे वाटायला नको की बोलायचं राहून गेलो, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. आमचे जागावाटप झाले आहे, त्यामुळे आता गद्दाराना स्थान नाही, फक्त निष्ठावंतांना तिकीट मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते बोलत आहेत. काँग्रेसशी चर्चा बंद आहे, मात्र आम्ही शेवटपर्यंत बोलत राहू. काँग्रेसला नगरपालिकेत यश मिळाले, त्यांचे आम्ही अभिनंदन केले. जर पुढे जाऊन त्यांची मदत लागली तर नक्कीच घेऊ, असेही राऊत म्हणाले.