Hindi Language Compulsion :
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणूक रिंगणात उद्धव आणि राज हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता अद्याप चर्चेच्याही पातळीवर पोहोचली नसली तरी हिंदी सक्तीच्या विरोधात ६ जुलैला मुंबईत निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात हे बंधू एकत्र येणार आहेत. मराठीच्या मुद्द्यावर निघणाऱ्या या मोर्चाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. राजकारणासाठी अंगावर भगवं वस्त्र घेऊन दिखावा केला जात असल्याची टीका सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोर्चाला विरोध केला आहे. सदावर्तेंनी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे. "राज ठाकरे कोण आहे? विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अडवे येत आहे. ज्ञान हेच ईश्वर आहे. जेव्हा ज्ञानाला ईश्वराच्या समान मानतो, तेव्हा अडवे येणारा राज ठाकरे कोण आहे. राज ठाकरेंचे वर्तन आणि मोर्चा काढणे गैरकायदेशीर आहे. गिरगाव चौपाटीपासून मोर्चा काढणे कायदेबाह्य आहे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचना आहेत, त्यानुसार आझाद मैदान सोडून दुसरीकडून मोर्चा निघू शकत नाही, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
उद्धव आणि राज एकत्र येऊन मोर्चा काढणार असं समजतंय. पण अनेकवेळा गंगामैयाचा अपमान करायचा, तर कधी साधू संतांवर बोलायचं आणि आता राजकारण करताना मात्र भगव वस्त्र अंगावर घ्यायचं. हा सगळा दिखावा आहे, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.