Raj Thackeray Uddhav Thackeray Together
मुंबई: महाराष्ट्र सरकारने हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यासाठी काढलेले दोन जीआर रद्द केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन पक्षांनी संयुक्त विजयी मेळावा आज (दि.५) वरळी येथील एनएससीआय डोम येथे झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यासपीठावर येताच दोघांनी एकमेकांना मिठी मारत समोरील उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष करून टाळ्यांचा गजर केला.
या मेळाव्याला दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे, मिठाई वाटून राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याबद्दल आनंद साजरा केला. मनसे नेते आणि कार्यकर्ते नाचून आनंद व्यक्त करत होते. मनसे नेते राजू पाटील, संदीप देशपांडे यांनीही नाचून आनंद व्यक्त केला.
आज सकाळी ११ वाजता या ऐतिहासिक मेळाव्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची उत्सुकता केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर सामान्य नागरिकांमध्येही शिगेला पोहोचली होती . याचेच प्रतिबिंब मुंबईच्या रस्त्यांवर लागलेल्या निमंत्रण पत्रिकेच्या पोस्टरमधून दिसत होते. विशेष म्हणजे, या पोस्टर्सवर मनसे किंवा शिवसेनेचा झेंडा नाही, केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो आणि त्याखाली 'कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा' ही एकच टॅगलाईन वापरण्यात आली आहे. यातून दोन्ही पक्ष मतभेद विसरून केवळ 'मराठी' या एका मुद्द्यावर एकत्र येत असल्याचा स्पष्ट दिसून आले.