Raj Thackeray Cryptic Post Pudhari
मुंबई

Raj Thackeray Post: 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते…', राज ठाकरेंच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; निशाणा नेमका कुणावर?

Raj Thackeray Cryptic Post: राज ठाकरे यांच्या “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते... तूर्तास एवढेच” या सूचक पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Rahul Shelke

Raj Thackeray Cryptic Post: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका छोट्याशा पोस्टने सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोणाचेही नाव न घेता राज ठाकरे यांनी “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते... तूर्तास एवढेच...” असे लिहिले आहे. त्यांच्या या मोजक्या शब्दांमागचा नेमका अर्थ काय, याबाबत आता विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

राज ठाकरे आपल्या भूमिकेबाबत थेट आणि परखड भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. मात्र यावेळी त्यांनी कोणावरही थेट टीका न करता केवळ एका म्हणीचा आधार घेत सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पोस्टचा रोख नेमका कोणाकडे आहे, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे.

अमित शाहांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात हिंदी दिवस आणि सहावे अखिल राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या बहुभाषिकतेचा उल्लेख केला.

महाराष्ट्राच्या भूमीवर मराठीसोबतच कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड, वारली यांसह अनेक भाषांचा विकास झाला असून या सर्व भाषांचा सन्मान केला जात असल्याचे अमित शाह यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य देशात दुसरे नाही, असेही त्यांनी नमूद केले.

याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. अमित शाह यांच्या वक्तव्यावरच राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नसल्याने त्यांच्या वक्तव्याचा नेमका संदर्भ अद्याप स्पष्ट झालेला नाही.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा उल्लेख

अमित शाह यांनी यावेळी मराठी भाषेच्या सन्मानाचाही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची बहुभाषिक संस्कृती ही त्याची विशेष ओळख असल्याचे सांगताना त्यांनी मराठीसह कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड आणि वारली अशा विविध भाषांचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील या भाषिक वैविध्याचा सन्मान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजभाषा आणि मातृभाषेच्या महत्त्वावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मातृभाषेचा तसेच राजभाषेचा सन्मान करण्यावर सातत्याने भर देत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना पुढे नेताना मातृभाषेसोबत किमान आणखी एक भारतीय भाषा शिकण्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी ही आपली मातृभाषा असून इतर भारतीय भाषा या आपल्यासाठी मावशीसारख्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाषिक सलोख्याची भूमिका मांडली.

राज ठाकरेंच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीसह सर्व भारतीय भाषांच्या सन्मानाची भूमिका मांडल्यानंतर राज ठाकरे यांची “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...” ही पोस्ट समोर आली आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमका कोणाला इशारा देत आहेत, यावरून राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी पोस्टच्या शेवटी “तूर्तास एवढेच...” असे म्हटल्याने त्यांच्या या विधानामागे आणखी काही राजकीय भाष्य दडले आहे का, याची उत्सुकता वाढली आहे. आता राज ठाकरे यावर पुढे काही स्पष्टीकरण देतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT