शिवसेना ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.  Pudhari
मुंबई

Mumbai Garjana morcha : निवडणूक आयोगाच्या नेमणुकीवरच आक्षेप : उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत महामोर्चा

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Garjana morcha : "देशातील राष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक होते. मग मुख्य निवडणूक आयुक्तांसारख्या मोठ्या पदासाठी निवडणूक का होत नाही, असा सवाल करत माझा निवडणूक आयोगाच्या नेमणुकीवर आक्षेप आहे. मागील काही महिन्यांमध्ये संपूर्ण १३ कोटी मतदार वगळण्यात आले आहेत, ज्ञानेश कुमारांची नेमणूक पक्षपातीपणे केली," अशा शब्दांमध्ये शिवसेना ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

ज्ञानेश कुमारांची नेमणूक पक्षपातीपणे केली

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात शिवसेना ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘विराट गर्जना मोर्चा’ काढण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण देशातून १३ कोटी मतदार वगळले आहेत. भारतीय जनता पक्षाला प्रशासन चालवता येत नाही. ज्ञानेश कुमारांची नेमणूक पक्षपातीपणे केली.

ठाण्यात पूर्णेकरांची हत्या, पोलिस काय करतायंत?

ठाण्यात प्रदीप पूर्णेकरांची हत्या, राज्यभर महिलांवर अत्याचार वाढलेत, पोलिस काय करतायंत?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. देशात कुणाचीही हुकूमशाही चालू देणार नाही, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

तिरंगा हातात घेऊन नागरिकांचा सहभाग

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आज (दि. ४) शिवसेना ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट ‘गर्जना’ मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमापासून या मोर्चाला प्रारंभ झाला आहे.मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. सहभागी नागरिकांनी केवळ तिरंगा हातात घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव आणि राज ठाकरे यांनी केले होते. सकाळी ११ वाजता मोर्चाची सुरुवात मेट्रो सिनेमापासून झाली. मोर्चाला सुरुवात होऊन तो मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने रवाना झाला.

बाळसाहेब थोरात, जयंत पाटील यांचा मार्चात सहभाग

शिवसेना ‘उबाठा’ आणि मनसेचे नेत्‍यांसह काँग्रेसच्‍या वतीने बाळासाहेब थोरात, राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍यावतीने जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्‍हाड मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात विविध भागातील आंदोलन हातात तिरंगा घेवून मोर्चात सहभागी झाले आहेत. अत्‍यंत शिस्‍तबद्‍ध पद्‍धतीने मुंबई महानगरपालिका मुख्‍यालयाकडे मोर्चा निघाला. राज ठाकरे यांच्‍या पत्‍नी शर्मिला ठाकरे, उर्वशी ठाकरे,मोर्चात सहभागी झालेल्‍यांच्‍या हातात संविधानांच्‍या प्रतीसह विविध मागण्‍यांचेही फलक होते. या मोर्चात तरुणाईचा सहभागही लक्षणीय ठरला.

ज्ञानेश कुमारांना तत्‍काळ जेलमध्‍ये टाका : माजी गृहमंत्री अनिल देशमुख

सभेच्‍या ठिकाणी बोलताना राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्‍हणाले की, एसआयआर संदर्भात अन्‍य दोन निवडणूक आयुक्‍तांनी तक्रार केल्‍यानंतरही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर केंद्र सरकारवर कोणतही कारवाई केलेली नाही. अनेक राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने गैरप्रकार केले आहेत. यामुळे संपूर्ण देशात निवडणूक आयोगाविरोधात रोष आहे. आता ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेवून त्‍यांना तत्‍काळ जेलमध्‍ये टाका, अशी मागणही त्‍यांनी केली.

भाजप सत्तेसाठी काहीही करु शकतात : बाळासाहेब थोरात

जनतेने ओळखले आहे की आपल्‍या मतांची चोरी होत आहे. त्‍यामुळेच आजचा मोर्चा हा अतिविराट मोर्चा आहे. संपूर्ण देशात निवडणूक प्रक्रियेवरील विश्‍वास उडाला असून देशभरात असंतोष निर्माण झाला आहे. भाजप सत्तेसाठी काहीही करेल. निवडणूक आयोग हा आपला गुलाम असल्‍याच्‍या भावनेतून मुख्‍य निवडणूक आयुक्‍तांची नियुक्‍ती झाली आहे. मत चोरी करुन सत्ता काबीज केले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT