मुंबई: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे असे महापुरुष आहेत, जे त्यांच्या टीकाकारांना पूर्ण कधी कळले नाहीत. सध्या सावरकरांचा उदोउदो करून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही ते किती समजले असतील ही शंकाच आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त समाजमाध्यमांत अभिवादनाची पोस्ट करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सावरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांसह त्यांचा राजकीय वापर करू पाहणाऱ्यांना फटकारले.
कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य-असत्य स्वतः तपासून बघितले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. सावरकर हे प्रखर हिंदू धर्माभिमानी होते, पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही. पण, आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणे सुरू आहे.
जिथे त्यांनी जातीअंताचा लढा दिला, त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणे सुरू आहे आणि याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. उठता बसता सावरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या, पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत, त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.
आपल्या परंपरेतले जे उत्तम आहे ते घेणे, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणे हे करणे म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली. तो उपचार ठरेल, असे सांगत राज यांनी सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन केले.