Raj Thackeray BJP Criticism Gokul President Election  Pudhari
मुंबई

Raj Thackeray: 'रडीचा डाव खेळणे बंद करावे’, ‘लोकशाही वाचवा’ म्हणणाऱ्या भाजपला राज ठाकरेंनी दाखवला आरसा; गोकुळच्या मुद्द्यावरून घेरले

Raj Thackeray BJP Criticism: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा दाखला देत त्यांनी भाजपच्या लोकशाहीविषयक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Rahul Shelke

Raj Thackeray BJP Criticism: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. भाजप सत्तेत असतानाही ‘लोकशाही वाचवा’ म्हणून मोर्चे काढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा दाखला देत राज ठाकरे यांनी भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला. लोकशाहीची काळजी असल्याचे सांगणाऱ्या भाजपने प्रत्यक्षात मात्र लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या निर्णयाचा आदर करायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. देशात खालपासून वरपर्यंत सत्तेत असतानाही हा पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत आहे. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा काढणे, हे जगातील एकमेव उदाहरण असावे, असा टोला त्यांनी लगावला.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा दाखला देत भाजपला सवाल

राज ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. या निवडणुकीत भाजपच्या पॅनलचे १२, तर सतेज पाटील यांच्या पॅनलचे १३ उमेदवार निवडून आले होते. मात्र, त्यानंतर सरकारने पाच संचालकांची नियुक्ती केली आणि त्यांना मतदानाचा अधिकारही दिला. यावरून राज ठाकरे यांनी भाजपला जाब विचारला आहे.

गोकुळची निवडणूक बॅलेट पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने झाली होती. मतदारांनी आपला कौल दिल्यानंतरही सरकारने पाच संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार का दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपला खरोखरच लोकशाहीची काळजी असती, तर असा प्रकार घडला नसता, असेही त्यांनी म्हटले आहे.

सत्ता मिळाली नाही म्हणून तत्त्वे बाजूला ठेवली?

गोकुळ दूध संघावर भाजपला सत्ता मिळवता आली नाही, म्हणून पक्षाने आपली तत्त्वे बाजूला ठेवली आहेत, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली. लोकशाहीचे रक्षण करण्याची भाषा करणाऱ्या भाजपने आधी स्वतःच्या कृतीतून लोकशाहीचा आदर दाखवावा, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या पाण्याचा भीषण दुष्काळ असताना भाजपमध्ये समजूतदारपणाचाही दुष्काळ पडल्याचे दिसत आहे, अशा शब्दांत त्यांनी उपरोधिक टोला लगावला.

लोकशाही, दहशतवाद आणि अर्थव्यवस्थेवरूनही टोला

राज ठाकरे यांनी भाजपच्या राजकारणावर टीका करताना लोकशाही, दहशतवाद आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे मुद्देही उपस्थित केले. भाजप सत्तेत असताना लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढेल आणि दुसरीकडे स्वतःच लोकशाहीचा गळा आवळेल, अशी टीका त्यांनी केली.

भाजपच्या काळात दहशतवादी हल्ले झाले आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर दहशतवादापासून देशाला वाचवण्यासाठीही भाजप मोर्चे काढेल. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली, तर अर्थव्यवस्था वाचवण्यासाठीदेखील मोर्चे काढेल, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

‘भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे’

आपल्या पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने ज्या मार्गाने बहुमत मिळवले, ते विरोधी पक्षांनी गेली १२ वर्षे सहन केले. आता देशातील जनता विरोधी पक्षांकडे झुकू लागली आहे, तर भाजपनेही हा बदल सहन करायला शिकले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या या टीकेमुळे भाजप आणि गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT