Raj Thackeray on MNS Mumbai Rally
मुंबई : मी आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो. तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का ठेवता? मतभेद विसरा, एकत्र या आणि निवडणुकीच्या तयारीला लागा. मराठी अस्मितेसाठी मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज (दि. ४) आयोजित केलेल्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, मराठीचा मुद्दा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा. ही आपली ओळख आहे, तिचा अभिमान बाळगा आणि जनतेपर्यंत पोहोचवा. मतदार यादी तपासा, त्यावर विशेष लक्ष केंद्रित करा. जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी, जे पक्षापासून दूर गेले आहेत, त्यांना पुन्हा सोबत घ्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र कामाला लागा, असे आवाहन करून युती संदर्भात काय करायचं, त्याचा निर्णय मी घेईन. तुम्ही फक्त कामावर लक्ष केंद्रित करा, असेही ते म्हणाले.
यावेळी मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार, हे टाळ्या मिळवण्यासाठी सांगत नाही. सर्वांनी एकत्र येऊन मेहनत करा, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाचे जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणा. जे दूर गेले आहेत, त्यांना पुन्हा सोबत घ्या. कोणतेही वाद, मतभेद विसरून एकत्र कामाला लागा, असे सांगत त्यांनी पक्षातील एकजुटीवर यावेळी भर दिला.
मुंबईत आपला पक्ष सर्वात जास्त बलवान आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेसाठी मनसेने घेतलेली भूमिका प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. पण हे करताना कोणाचाही द्वेष करण्याची गरज नाही. कुणाला विनाकारण मारू नका, आधी समजावून सांगा. मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर शिकवा. उर्मट बोलत नसेल तर वाद घालू नका.पण उर्मट बोलला, तर मग पुढे तशी भूमिका घ्या, असे ते म्हणाले.
आतापासूनच आपल्या वॉर्डमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागा. स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करा, ग्राउंडवर उतरून काम करा. कोणत्याही दबावाला बळी न पडता, पूर्ण आत्मविश्वासाने काम करा. पक्षातील अंतर्गत गटबाजी, हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र काम करा, अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या.