Raj Thackeray National Film Awards Gujarat Pudhari
मुंबई

Raj Thackeray: 'राष्ट्रीय पुरस्कार गुजरातमध्येच का?', राज ठाकरेंचा संतप्त सवाल, कलाकारांना केलं मोठं आवाहन

Raj Thackeray National Film Awards Gujarat: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीहून गुजरातमधील केवाडिया येथे हलवण्याच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

Rahul Shelke

Raj Thackeray National Film Awards Gujarat: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दिल्लीऐवजी गुजरातमधील केवाडिया येथे करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा सोहळा देशाच्या राजधानीबाहेर होत असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

राज ठाकरे यांनी या निर्णयामागचे कारण काय, असा सवाल उपस्थित केला आहे. “स्वतःला काही निर्माण करता आलं नाही की नावं बदला, स्थळं बदला आणि त्यातून भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न करा, असा प्रकार सध्या सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली.

“पुरस्कार सोहळा मुंबईत का नाही?”

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके महाराष्ट्रातील असल्याचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा मुंबईत का आयोजित केला जात नाही, असा प्रश्न विचारला. महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मिती होत असल्याचे सांगत त्यांनी यापैकी एखाद्या राज्याची निवड का करण्यात आली नाही, अशी विचारणा केली.

“दक्षिण भारतात तर सिनेमांनी तिथल्या राजकारणालाही आकार दिला आहे. मग गुजरातच का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

“देशाच्या प्रगतीचा पाळणा गुजरातमध्ये हलवायचा आहे का?”

केंद्र सरकारच्या विविध निर्णयांचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. कॉमनवेल्थ स्पर्धा गुजरातमध्ये, २०२३च्या क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना गुजरातमध्ये, परदेशी राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात गुजरातला प्राधान्य आणि गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातमध्ये नेण्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी, “या सगळ्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दाखवायचं आहे? या देशाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा पाळणा गुजरातमध्ये हलला आहे, असं दाखवायचं आहे का?” असा सवाल केला.

भारताची प्रगती ही केवळ एका राज्याच्या योगदानातून झालेली नसून देशातील प्रत्येक प्रांतातील नागरिकांच्या आणि अनेक पिढ्यांच्या त्यागातून देश उभा राहिला आहे, असेही त्यांनी म्हटले.

“सत्ताधाऱ्यांचा कलेशी संबंध फक्त प्रचारापुरता”

राज ठाकरे यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या कलाक्षेत्रातील भूमिकेवरही टीका केली. सध्याचे सत्ताधारी कलासक्त नसल्याचे सांगत, “कशाही निवडणुका जिंकायच्या ही एकमेव कला आणि त्यासाठी सगळ्यांवर सक्ती, इतकाच यांचा ‘कलासक्त’पणाशी संबंध आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

चित्रपटांबाबतही त्यांनी सरकारवर टीका करत, “वाट्टेल ते प्रचारकी सिनेमे बनवून घ्यायचे आणि त्यांना पुरस्कार द्यायला लावायचे,” असा आरोप केला.

“कलाकारांनी आता आवाज उठवायला हवा”

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे स्थळ केवाडिया असणे हा मुख्य मुद्दा नसून, दिल्लीतील पुरस्कार सोहळ्याची दीर्घकाळ चालत आलेली परंपरा का मोडली जात आहे, हा खरा प्रश्न असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

“देशाच्या राजधानीत या पुरस्काराची जी उज्ज्वल परंपरा आहे, ती का मोडली जात आहे, यावर कलाकारांनी बोललं पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. कलाकारांनी सरकारच्या भूमिकेविरोधात आवाज उठवला नाही, तर भविष्यात राष्ट्रीय पुरस्कारांसाठीही विशिष्ट राज्यातील स्थळांची सक्ती केली जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

“महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी कणखर भूमिका घ्यावी”

या निर्णयाला दक्षिणेतील सिनेमाप्रेमी राज्यांकडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त करताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रानेही ठाम भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांनी कणखर भूमिका घेतली नाही, तर भविष्यात दख्खन प्रांताची ओळख आणि अस्मिता धोक्यात येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

गुजराती बांधवांनाही त्यांनी आवाहन केले की, केवळ आपल्या भाषिक नेत्यांची सत्ता आहे म्हणून या निर्णयाचा अतिरेकाने आनंद मानू नये. देशातील इतर राज्यांतील नागरिक आणि नेते आपल्या राज्यांवर व व्यावसायिकांवर झालेल्या अन्यायाचा हिशेब ठेवतील, असा इशाराही त्यांनी दिला.

“समस्त कलाकारांनी भूमिका घ्यावी”

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या आयोजन स्थळावरून सुरू झालेल्या या वादाला आपण वाचा फोडणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच देशातील सर्व कलाकारांनीही या विषयावर भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

“सरकारच्या स्तुतीची गीतं गायला सांगितली की ती लगेच गायला सुरुवात केल्यामुळे आज ही वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी याविरोधात भूमिका घ्यायलाच हवी,” असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे स्थळ बदलण्याचा निर्णय आणि त्यामागील राजकीय भूमिका यावर नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT