Shiv Sena Dasara Melava Raj Thackeray Uddhav Thackeray :
मुंबईमध्ये आज (दि. १०) दसरा मेळाव्याच्या दिवशी दोन्ही शिवसेनांचे दसरा मेळावे पार पडणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यभरातून कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होणार असून, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
दरम्यान, दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा रथ तयार होत आहे. यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचे एकत्र फोटो दिसत आहेत. या फोटोबाबत विचारल्यानंतर एका शिवसैनिकानं हे दोघं एकत्र यावेत आणि राज साहेबांनी पक्ष विलीन करावा अशी माझी इच्छा असल्याचं सांगितलं.
शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर उद्धाव ठाकरेंची सभा होणार आहे, तर नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेची तोफ धडाडणार आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये दरवर्षी येणारे रथ आता सज्ज आहेत. अनेक वर्षांपासून हे रथ दसरा मेळाव्यासाठी येतात, मात्र यंदा या रथावर एक वेगळेपण पाहायला मिळाले. या वर्षीच्या रथावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, आणि या चर्चेमध्ये आता एका शिवसैनिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
याबाबत बोलताना शिवसैनिक म्हणाला, हा फोटो लावण्यामागील भावना स्पष्ट करताना संबंधित शिवसैनिकाने म्हटले आहे की, "हे दोघं एकत्र यावं आणि आता राज साहेबांनी पक्ष विलीन करावा, अशी माझी स्वतःची इच्छा आहे". अनेक शिवसैनिकांनी देखील राज साहेबांनी उद्धव साहेबांच्या ह्या पक्षात विलीन व्हावे, असे आपल्याला सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिवसैनिकाच्या मते, उद्धव साहेब हे राज साहेबांना मुख्यमंत्रीच करणार, याची आपल्याला १००% खात्री आहे. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तर खरोखर महाराष्ट्र एकदम एक नंबर राहील, असे त्यांचे म्हणणे आहे.
यावेळी, शिवसैनिकांनी ऐतिहासिक संदर्भही दिला. १९६६ पासून 'साहेबांनी' खासदार, आमदार, मुख्यमंत्री तसेच लोकसभेच्या अध्यक्षांपर्यंत सगळ्यांना पदं दिली. परंतु, सगळे साहेबांना सोडून गेले.
शिवसैनिकांनी आजचा दिवस 'सगळ्यात मोठा दिवस' असल्याचे सांगितले. आता वेळ लावू नका, डायरेक्ट घोषणा करा. आपल्याला अख्खा भारत देश फिरायचा आहे. 'साहेबांचा' पुत्र असल्यामुळे उद्धव साहेब पंतप्रधान होणार, आणि हे लाखो करोडो शिवसैनिकांच्या आशीर्वादामुळे होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.