Raj-Uddhav Thackeray Interview: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक संयुक्त मुलाखत चांगलीच गाजते आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर थेट संवाद साधताना दिसले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि केंद्रातील नेतृत्वावर दोघांनीही टीका केली आहे.
मुंबईच्या भवितव्यावर बोलताना राज ठाकरे यांनी थेट मुद्द्याला हात घातला. मुंबईमध्ये सध्या जे प्रकल्प सुरू आहेत, त्यामागे नेमकं कोणाचं हित साधलं जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाढवण बंदराच्या परिसरात विमानतळाचा प्रस्ताव, नवी मुंबई विमानतळाचा विस्तार आणि सध्याच्या मुंबई विमानतळाचं भवितव्य, या सगळ्या गोष्टी एकाच दिशेने जात असल्याचा दावा त्यांनी केला.
राज ठाकरे म्हणाले की, नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबईतील कार्गो, नंतर देशांतर्गत आणि अखेरीस आंतरराष्ट्रीय विमानसेवाही तिकडे वळवली जाऊ शकते. सध्याचं मुंबई विमानतळ आधीच अदानी समूहाकडे आहे. हे विमानतळ जर पूर्णपणे रिकामं झालं, तर त्याची प्रचंड जमीन पुन्हा व्यावसायिक वापरासाठी खुली केली जाईल, असा संशय त्यांनी व्यक्त केला. “इतक्या मोठ्या क्षेत्रात किमान पन्नास शिवाजी पार्क मावतील,” असं सांगत त्यांनी या जागेकडे लक्ष वेधलं.
याच मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी देशातील दोन मोठ्या उद्योगसमूहांची तुलना केली. अंबानी आणि अदानी यांच्यातील फरक स्पष्ट करताना त्यांनी म्हटलं की, “व्यवसाय करत असताना चोऱ्यामाऱ्या तर सगळेच करत असतात. पण दोघांमधला खरा फरक वेळेचा आहे. नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात मोठे होण्याआधीच अंबानी उद्योगजगतामध्ये प्रस्थापित होते. अदानींचा विस्तार मात्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि पंतप्रधान झाल्यानंतरच वेगाने झाला.”
मुंद्रा बंदरापासून ते विविध मोठ्या प्रकल्पांपर्यंत अदानी समूहाला मिळालेल्या टेंडरचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. “समजा आज केंद्रात भाजपाऐवजी काँग्रेस किंवा अन्य कुठल्या पक्षाचं सरकार असतं आणि एखाद्या उद्योगपतीवर अशीच मेहेरबानी झाली असती, तर भाजपाची प्रतिक्रिया काय असती?” असा सवाल त्यांनी केला.
या मुलाखतीमुळे एकीकडे उद्योग-राजकारणातील जवळीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, तर दुसरीकडे मुंबईच भविष्य कसं असणार, याबाबतही नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.