Raj- Uddhav Thackeray Joint Press Conference: "उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाही," अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि. २४ डिसेंबर ) भाजपच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत ते म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ सध्या फिरतोय. माझ्याकडे असे बरेच व्हिडिओ आहेत." असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आज युतीची अधिकृत घोषणा केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हे आम्ही आता सांगणार नाही. आम्ही फक्त एकत्र आलो आहोत, हे जाहीर करत आहोत. बाकी जे काही बोलायचे आहे, ते जाहीर सभांमधून बोलूच," असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांना लवकरच अर्ज भरण्याबाबत सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.
"महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत, त्यात दोन व्यक्ती समाविष्ट आहेत. हे लोक राजकीय पक्षांमधील मुलं (नेते/कार्यकर्ते) पळवत आहेत," असा घणाघातही त्यांनी केला.
"मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच (युतीचा) असेल, "माझ्या महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की, या नव्या प्रवासात आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहा," असे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले. दरम्यान, वरळीतील हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत युतीची घोषण करण्यापूर्वी राज व उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवनादन केलं. दोन्ही बंधूंनंतर रश्मी ठाकरे व शर्मिला ठाकरे तसेच आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांनीही पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.