मुंबईः ईव्हीएमच्या माध्यमातून कोण जिंकणार हे आधीच फिक्स केले जाते. तशा युक्त्या वापरून प्रोग्रामिंग केले जाते. तर दुसरीकडे मतदार यादीतील घोळ आहेतच. काही गोष्टी लपवून, मतदार याद्यांतील गोंधळ कायम ठेवून निवडणुका घेण्याचा विचार म्हणजेच मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी हॉटेल रंगशारदा येथील पदाधिकारी मेळाव्यात केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी रंगशारदा येथे पदाधिकाऱ्याना संबोधित केले. यावेळी मतदार यादीतील घोळ, ईव्हीएमच्या प्रोग्रामिंगमधील गडबडी आदींवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. सभा, मेळाव्याच्या आधी कधी सांस्कृतिक कार्यक्रम असतात, नाटक असते पण आज जादूचे प्रयोग दाखवत आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी उपस्थितांची उत्सुकता ताणून धरली. ईव्हीएम हटाव सेनेचे अमित उपाध्याय व याशीत पटेल यांनी मेळाव्यात ईव्हीएम हॅकचे प्रात्यक्षिक दाखविले. उपाध्याय यांनी प्रात्यक्षिकामध्ये 2 केळी, 2 कलिंगड व 1 सफरचंदला मत दिले. पण, प्रत्यक्षात 3 मते सफरचंदला मिळाली.
ईव्हीएममध्ये काळी काच आणि लाईट सेन्सरच्या मदतीने मतचोरी केली जाऊ शकते असा दावा सादरीकरणाच्या माध्यमातून केला. ईव्हीएमच्या प्रोगॅममध्ये बदल करता येतात. याला हॅकिंग म्हणत नाहीत तर प्रोग्रॅम सेट करणे म्हणतात असे ते म्हणाले. राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्रे उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यावर राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, हे किल्ले छत्रपती शिवरायांनी उभारले. त्यामुळे तेथे अन्य कोणाच्याही नावाने पर्यटन केंद्रे उभारण्याला आमचा विरोध असेल.