Raj- Uddhav Thackeray Meeting :
शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १०) राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. यामुळं शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना ऊत आलाय. या सर्व घडामोडी सुरू असतानाच राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
आज अचानक उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावर भेट घेण्यासाठी गेले. त्यांच्या सोबत शिवसेनेचे संजय राऊत आणि अनिल परब हे महत्वाचे नेते होते. मनसेकडून बाळा नांदगावकर देखील या भेटीदरम्यान उपस्थित असल्याची माहिती मिळतेय. ही भेट गेल्या अनेक भेटींप्रमाणे कौटुंबिक नव्हती. त्यामुळं राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली. या भेटीत आगामी महापालिका निवडणुकीबाबत काही चर्चा होते का याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र याबाबतचा तपशील अजून तरी समोर आलेला नाही.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी निमंत्रण दिलं. त्यामुळं हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आणि या दोघांच्या मुलूख मैदानी तोफा पुन्हा धडाडणार अशी आशा शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. मात्र राज ठाकरे यांनी हे निमंत्रण स्विकारलं आहे की नाही याबाबत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, या भेटीनंतर मनसे नेते राज ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेकडून आलेल्या दसऱ्या मेळाव्याच्या आमंत्रणाचं काय करायचं याबबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे हे आपला निर्णय जाहीर करतील अशी शक्यता आहे. त्यामुळं आता मनसेच्या उद्या होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.