Raj Thackeray Chhath Puja Controversy Pudhari
मुंबई

Raj Thackeray: 'शांत आहोत म्हणजे आम्ही XXX नाही', छठ पूजेवरुन राज ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका; मराठी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन

Raj Thackeray Chhath Puja Controversy: छठ पूजेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात धार्मिक आणि भाषिक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी भाजपवर केला.

Rahul Shelke

Raj Thackeray Chhath Puja Controversy: छठ पूजेच्या मुद्द्यावरून मुंबई आणि महाराष्ट्रात सांस्कृतिक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित सोशल मीडिया यंत्रणांकडून धार्मिक आणि भाषिक मुद्द्यांना हवा दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, भाजपने आखलेल्या संघर्षाच्या राजकारणात मराठी जनतेने अडकू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या निवेदनातून छठ पूजेच्या निमित्ताने सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या रिल्स, मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्याचे प्रकार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वादांवर भाष्य केले. भाजपला मुंबईत मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये संघर्ष निर्माण करायचा आहे. मात्र, अपेक्षित असलेला वाद निर्माण होत नसल्याने वेगवेगळे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्यामागे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे राजकारण असल्याचेही त्यांनी म्हटले.

भाजपच्या राजकारणावर टीका

भाजपकडे निवडणुका जिंकण्यासाठी आता नवे मुद्दे उरलेले नाहीत. त्यामुळे धार्मिक, जातीय आणि भाषिक वाद निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

लोकसभा निवडणुकांच्या काळात हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला जातो, तर राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, असे ते म्हणाले. कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून गुजराती आणि मराठी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला.

भाजपला विकासकामांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नसल्याने दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेतला जातो, असा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीतील विजयासाठी निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले.

जेन झी आंदोलनानंतर भाजपची चिंता वाढली?

जेन झी आंदोलनापासून भाजपच्या सत्तेला उतरती कळा लागल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. केंद्रापासून राज्यांपर्यंत भाजपची सत्ता जाण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आगामी काळात भाजपला सत्तेबाहेर जावे लागेल, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले.

सत्तेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या १२ ते १४ वर्षांत केलेल्या कामांचा हिशेब द्यावा लागेल, याची भीती भाजपला वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील उद्योग आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरूनही निशाणा

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील उद्योग, जमीन आणि जंगलांच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील उद्योग आणि नैसर्गिक साधनसंपत्ती एका उद्योगपतीच्या फायद्यासाठी वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून जंगलांपर्यंत अनेक भागांवर विकासाच्या नावाखाली अतिक्रमण होत असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रातील जमिनी, जंगले आणि उद्योगांबाबत मराठी माणसाने जागरूक राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी जनतेला राज ठाकरेंचे आवाहन; म्हणाले, सापळ्यात अडकू नका!

या संपूर्ण निवेदनात राज ठाकरे यांनी मराठी जनतेला विशेष आवाहन केले आहे. छठ पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे! तसेच भाजपने तयार केलेल्या संघर्षाच्या मैदानात उतरून आपली ताकद वाया घालवू नका, असे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा दाखला देत त्यांनी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उत्तर देण्याची भूमिका मांडली. कोणत्याही मुद्द्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घेऊन निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

मराठी समाजाने आजूबाजूला घडणाऱ्या घटना विसरू नयेत. एखादी घटना घडल्यानंतर दोन दिवस चर्चा करून पुन्हा सर्व विसरण्याची सवय सोडली पाहिजे. योग्य वेळी आपली नाराजी व्यक्त केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

उत्तर भारतीय आणि गुजराती समाजालाही राज ठाकरेंचा संदेश

उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाला उद्देशूनही राज ठाकरे यांनी महत्त्वाचे विधान केले. भाजप स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी या समाजांना मराठी माणसाच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यामुळे अशा राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, महाराष्ट्राच्या विरोधात कोणी उभे राहिल्यास महाराष्ट्र आपली ताकद दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT