मुंबई : आजारी वडिलांना भेटण्यासाठी पत्नी शिल्पा शेट्टीसोबत लंडनला जाण्याची परवानगी द्या. अशी विनंती करणार्या व्यावसायिक राज कुंद्रा ला उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा हिसका दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आर आर भोसले यांच्या खंडपीठाने दोघांना परदेशात जायचे असेल तर आधी 60 कोटी रुपये जमा करावेत. अथवा तेवढ्या रक्कमेची बँक गॅरंटी द्या. त्या नंतरच याचिकेवर विचार केला जाईल, असे स्पष्ट करत याचिकेची सुनावणी एक आठवडा तहकूब ठेवली.कथित 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात न्यायालयाने हे आदेश दिले.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. 14 ऑगस्ट रोजी जुहू पोलिस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध व्यापारी दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांविरोधात लूकआउट नोटीस जारी केली केली.
कुंद्रा याने गुन्हा रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. ती न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याने आजारी वडिलांना लंडन येथे भेटायला जाण्यासाठी परवानगी द्यावी तसेच लुकआऊट नोटीस रद्द करण्यात यावी अशी मागणी करत अॅड. प्रशांत पाटील यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.
60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे हे प्रकरण आहे. त्यामुळे तेवढीच 60 कोटी रक्कम जमा करा, असे खंडपीठाने सांगितले. यावेळी कुंद्राच्या वकिलांनी ही रक्कम मोठी असल्याने भरणे शक्य नसल्याने ती कमी करावी अशी विनंती केली. रक्कम भरता येत नसेल तर तेवढ्या रक्कमेची बँक गॅरंटी देणार का ते आठवड्याभारत सांगा असे स्पष्ट करीत सुनावणी तहकूब ठेवली.