Raj Kundra Shilpa Shetty fraud case : राज कुंद्रा-शिल्पाला दिलासा नाहीच
मुंबई ः आर्थिक फसवणुक प्रकरणी अडचणीत आलेल्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. राज्य सरकारचा याचिकेला असलेला विरोध पाहता मुख्य न्या. चंद्रशेखर, न्या. गौतम अखंड यांच्या खंडपीठाने कौटुंबिक सहलीनिमित्त फुकेतला जाण्याची परवानगी नाकारली.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून जाण्यास निर्बंध आहेत. 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान कौटुंबिक सहलीनिमित्त फुकेतला जाण्याची परवानगी मिळावी यासाठी दोघांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर बुधवारी मुख्य न्या. श्री चंद्रशेखर, न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
सुनावणीवेळी याचिका कर्त्यांच्या वतीने हा गुन्हा काही वर्षांपूर्वीचा असून राज कुंद्रा हे एक हॉटेल व्यावसायिक आहेत. फसवणूक प्रकरणी त्यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. ते समन्सनुसार चौकशीलाही सामोरे गेले आहेत. राज्य सरकारच्यावतीने मुख्य सरकारी वकील मनकूंवर देशमुख यांनी याचिकेला जोरदार आक्षेप घेतला. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात पूर्वीचे दोन गुन्हे प्रलंबित आहेत. खंडपीठाने याची दखल घेत याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देत परदेशात जाण्याची मागणी फेटाळून लावली.

