Raj K Purohit death
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राज के. पुरोहित (वय ७०) यांचे आज पहाटे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, एक अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुरोहित यांचा मुलगा आकाश मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आला आहे. त्याची कारकीर्द पाहण्यापासून पिताश्री राज पुरोहित वंचित राहिले. पुरोहित हे मुंबई शहरातील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आणि कुलाबा मतदारसंघातून एकदा निवडून आले होते. ते पंचवीस वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. गृहनिर्माण मंत्री असताना मुंबईच्या भाडेकरुंसाठी त्यांनी चांगले काम केले होते.
पुरोहित यांना प्रकृतीच्या तक्रारीमुळे १५ जानेवारी रोजी सायंकाळी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज, पहाटे ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राज के. पुरोहित यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल. सकाळी ११:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत तिथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी १ वाजल्यानंतर अंत्ययात्रा सुरू होणार असून सोनापूर लेन स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी पार पडतील.