मुंब्रा रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पीडितांना रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वार्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. आर्थिक मदत दूरच राहिली मात्र अपघातानंतर साधी विचारपूसही केली गेली नसल्याची कैफियत एका पीडित तरुणाची आई मीना भोईर यांनी मांडली आहे.
रेल्वे अपघातग्रस्त हे वर्षानुवर्षे मदतीपासून वंचित राहत असून त्यांच्या मदतीसाठी असणार्या किचकट प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे त्यांना पैसेच मिळत नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दोन आठवड्यापूर्वी मुंब्रा कसारा लोकलने गर्दीत प्रवास करणार्या प्रवाशांचा दोन लोकल एकमेकांना मुंब्रा येथे घासल्याने अपघात झाला. या अपघातात 5 निष्पाप बळी गेले तर 7-8 जण हे गंभीर जखमी झाले. यातील काही जणांना हाताला पायाला फ्रॅक्चर झाले. त्यांना तत्काळ ठाणे पालिकेचे कळवा रुग्णालय आणि ज्युपीटर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यात केवळ दोन-तीन दिवस वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी विचारपूस केली. मात्र त्यानंतर रेल्वे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीनी साधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप या जखमींच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान प्रवासातील जखमी प्रवासी हे नोकरी, करणारे असून हातावर पोट असणारे आहेत. या अपघातानंतर ना रेल्वे प्रशासन, ना राज्य सरकार यांनी अपघातात मृत पावलेल्याना ना तातडीने आर्थिक मदत केली. ना जखमींची विचारपूस केली. अपघातानंतर दोन आठवडे उलटूनही अपघातग्रस्त जखमी कुटुंबीयांकडे सर्वांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटास सामोरे जावे लागणार असून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्याची मागणी होत आहे.
मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्ड यांना 10 दिवसापूर्वी निवेदन देऊनही जखमींना आर्थिक मदत दिलेली नाही हा प्रकार संतापजनक असल्याचे मत मध्य रेल्वे व कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस श्याम उबाळे यांनी व्यक्त केला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या अशा कारभारामुळे ही सर्व कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. किमान ठाणे जिल्ह्यातील खासदार आणि आमदार, यांनी या अपघातग्रस्त जखमींच्या मदतीसाठी पुढे सरसावून त्यांना वेळीच न्याय द्यावा, अशी कैफियत या अपघातातील एका पीडित तरुणीने मांडली आहे.