Railway Fine Rules 2026 Pudhari
मुंबई

Railway Rules: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! नियम मोडल्यास भरावा लागणार दुप्पट दंड; नवे नियम लागू

Railway Fine Rules 2026: 20 जून 2026 पासून रेल्वेतील विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवरील दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Railway Fine Rules 2026: रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 20 जून 2026 पासून रेल्वेतील विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने शिस्त, सुरक्षितता आणि प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र तिकीटाशिवाय प्रवास करणे, महिला डब्यात पुरुषांनी प्रवेश करणे, रेल्वे परिसरात धूम्रपान करणे, मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे, रेल्वे कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कठोर दंडाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना तपासणीदरम्यान टीटीई (Travelling Ticket Examiner) आणि आरपीएफ (Railway Protection Force) यांच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रत्येकाने वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि रेल्वेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

कोणत्या नियमासाठी किती दंड?

1) तिकीटाशिवाय प्रवास – ₹500

तिकीट नसताना रेल्वेने प्रवास करताना पकडल्यास 500 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय तिकीटाचे भाडेही आकारले जाऊ शकते.

2) दुसऱ्याच्या तिकीटावर प्रवास – ₹500

इतर व्यक्तीच्या नावावर असलेल्या तिकीटावर प्रवास करणे हा नियमभंग मानला जाईल. अशा प्रवाशांवर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल.

3) बेकायदेशीर विक्री (हॉकिंग) – ₹2,000

रेल्वे स्थानक किंवा डब्यांमध्ये परवानगीशिवाय वस्तू विकताना आढळल्यास 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

4) मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन – ₹1,000

दारूच्या नशेत प्रवाशांना त्रास देणे, गोंधळ घालणे किंवा सार्वजनिक व्यवस्था बिघडवल्यास 1 हजार रुपयांचा दंड होईल.

5) शिवीगाळ किंवा आक्षेपार्ह भाषा – ₹1,000

इतर प्रवासी किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांशी अपमानास्पद किंवा अश्लील भाषेत बोलल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.

6) रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा – ₹2,500

टीटीई, गार्ड, लोको पायलट किंवा इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अधिकृत कामात अडथळा निर्माण केल्यास 2,500 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

7) अनधिकृत प्रवेश (Trespassing) – ₹500

रेल्वे रुळ ओलांडणे किंवा प्रतिबंधित भागात अनधिकृतपणे प्रवेश केल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जाईल.

8) आरक्षित डब्यातून उतरण्यास नकार – ₹2,000

आरक्षण नसतानाही आरक्षित डब्यात बसून उतरायला नकार दिल्यास 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

9) चालक किंवा वाहकाच्या सूचनांचे पालन न करणे – ₹500

रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास 500 रुपयांचा दंड होईल.

10) महिला डब्यात पुरुषांचा प्रवास – ₹2,500

महिलांसाठी राखीव डब्यात पुरुष प्रवाशांनी विनापरवानगी प्रवास केल्यास 2,500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

11) मालाची खोटी माहिती– प्रति क्विंटल ₹500

रेल्वेत वाहतूक करताना मालाबाबत चुकीची माहिती दिल्यास प्रति क्विंटल 500 रुपयांचा दंड आकारला जाईल.

12) धोकादायक किंवा प्रतिबंधित माल बाळगणे – ₹10,000

स्फोटके, ज्वलनशील पदार्थ किंवा अन्य धोकादायक वस्तू बाळगल्यास तब्बल 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. काही प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाईही होऊ शकते.

13) सार्वजनिक सूचना फलकांचे नुकसान – ₹2,000

रेल्वे स्थानकावरील सूचना फलक, भिंती किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास 2 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.

14) रेल्वे परिसरात धूम्रपान – ₹2,000

स्थानक, प्लॅटफॉर्म किंवा रेल्वे डब्यांमध्ये धूम्रपान करताना पकडल्यास 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन

रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासापूर्वी वैध तिकीट घ्यावे, रेल्वेचे नियम पाळावेत आणि तपासणीदरम्यान टीटीई व आरपीएफ कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. नियमांचे पालन केल्यास अनावश्यक दंड, कारवाई आणि प्रवासातील अडचणी टाळता येतील.

रेल्वेने स्पष्ट केले की, वाढीव दंडाचा उद्देश महसूल वाढवणे नसून प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वेतील शिस्त आणि सर्वांसाठी अधिक सुरक्षित व सुखकर प्रवासाची व्यवस्था निर्माण करणे हा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने जबाबदारीने प्रवास करून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT