Rahul Narwekar file photo
मुंबई

Rahul Narwekar: अस्पष्ट प्रिंट आणि तांत्रिक चूक! मराठीच्या चुकीच्या उच्चारांवर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करताना मराठी भाषेची अक्षरशः चिरफाड केल्याने ते टीकेचे धनी ठरले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Rahul Narwekar

मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करताना मराठी भाषेची अक्षरशः चिरफाड केल्याने ते टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांच्यावर समाज माध्यमांवर प्रचंड टीका होत असून विरोधकांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या शैलीत त्यांच्यावर टीका केली. यानंतर नार्वेकर यांनी आज (दि. २४) सारवासारव करत माफी मागितली आहे.

नार्वेकर काय म्हणाले?

"सभागृहात बारा शोक प्रस्ताव होते. मला जी प्रिंट मिळाली ती अस्पष्ट होती. काही तांत्रीक चुका होत्या, त्यामुळे वाचन करताना चूक झाली. आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचार कोणतीही व्यक्ती करू शकत नाही. जे घडले ते एका चुकीमुळे झालं, त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. राज्यातील लोकांचे, सभागृहातील सदस्यांचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. गेली ४ वर्ष मी अध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक भाषण आणि शोक प्रस्ताव मराठीत मांडले आहेत. मराठी भाषेबद्दल या सभागृहातील प्रत्येक सदस्याला अभिमान आहे तसा मला आहे. आशा भोसले यांच्याबाबत मला अभिमान आहे. माझ्या चुकीमुळे जर कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. ," असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदावरील व्यक्तीने अशा प्रकारे मराठीची मोडतोड केल्याने समाज माध्यमावर संताप व्यक्त केला जात आहे. हा मराठी भाषेचा अपमान असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या नार्वेकर यांनी मराठीचे चुकीचे शब्द वापरले असून त्यांच्या मराठी ज्ञानाची चिरफाड समाज माध्यमावर करण्यात येत आहे.

शोक प्रस्तावावर बोलताना नार्वेकरांच्या २६ चुका

नार्वेकर यांनी शोक प्रस्तावावर आपले मनोगत व्यक्त करताना एकूण २६ चुका केलेल्या आहेत. मराठीच्या ललाटी वैभव आहे. या वाक्यात ललाटी शब्द का वापरला आहे ते माहीत नाही. आशा भोसले यांच्या वडिलांचे नाव दीनानाथ मंगेशकर असताना नार्वेकर यांनी ते नाव दीनदयाळ असे वाचले.

राज ठाकरे काय म्हणाले?

नार्वेकर यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का ? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

नार्वेकरांनी हा प्रस्ताव हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं. कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाळ मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते. त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत, ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं अशी झाली आहे, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा राज ठाकरेंनी निषेधही केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT