मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नसल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत आयोगाने पालिका आयुक्तांना यासंदर्भातील अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी अर्ज दाखल केले. याप्रसंगी राहुल नार्वेकर हेही उपस्थित होते. तेव्हा या तीन प्रभागांतील अन्य उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आणि धमकावल्याचा आरोप अन्य पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे. यासंदर्भात काही पक्षांच्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. इतर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवून नार्वेकर यांना स्वतःच्या नातेवाइकांना बिनविरोध निवडून आणायचे होते, असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.
अर्ज दाखल करतानाचा उमेदवारांचा व्हिडीओ, उमेदवारांसोबत कोणकोण उपस्थित होते, राहुल नार्वेकर कशासाठी आले होते, त्यांनी खरोखरच उमेदवारांना धमकावले काय, तसे असेल तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने कोणती खबरदारी घेतली, नसेल तर कार्यवाही का केली नाही आदी मुद्दे यासंदर्भात विचारात घेतले जाणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. संजय राऊत व उद्धव ठाकरे गटाकडून अशीच अपेक्षा होती. कारण जेव्हा आपला पराजय दिसतो, तेव्हा असे बिनबुडाचे आरोप करून पराजयाची कारणे शोधण्याचा प्रयत्न चालू असतो. त्यातलाच हा प्रकार आहे. संजय राऊतांना त्यांचा व त्यांच्या पक्षाचा पराभव दिसत असल्यामुळे ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे नार्वेकर म्हणाले.