Rahul Gandhi File Photo
मुंबई

Rahul Gandhi on MPSC Student Protest: एमपीएससीवर भाजपचा ताबा? राहुल गांधींचा सरकारवर गंभीर आरोप; विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. एमपीएससीची स्वायत्तता आणि विश्वासार्हता नष्ट केल्याचा आरोप केला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्रात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचा हा संताप केवळ एखाद्या परीक्षेपुरता किंवा भरतीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवरून त्यांचा उडालेला विश्वास दर्शवतो, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच एमपीएससीसारख्या घटनात्मक संस्थेवर ताबा मिळवून तिची स्वायत्तता आणि विश्वासार्हता पूर्णपणे नष्ट करण्यात आली असल्याचा हल्लाही त्यांनी चढवला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी ‘एमपीएससी’वर भाजपने ताबा घेतल्याचा गंभीर आरोप केला.

केंद्र असो वा राज्य, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे देशातील आणि राज्यातील तरुण वर्ग पूर्णपणे त्रस्त झाला आहे. पेपर फुटीचे सत्र, वर्षानुवर्षे रखडलेल्या भरती प्रक्रिया, शिक्षणाचा प्रचंड वाढलेला खर्च, वसतिगृहांची दयनीय अवस्था आणि जेवणाचा खालावलेला दर्जा यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तसेच ‘डीबीटी’ योजनेतील कथित गैरव्यवहारांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत चिंता व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, एमपीएससीची विश्वासार्हता पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळ सुरू आहे. उज्ज्वल भविष्यासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी विद्यार्थी करत असलेली प्रत्येक मागणी पूर्णपणे रास्त आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी सरकारला तत्काळ पावले उचलण्याचे आवाहन केले.

आमदार विक्रम पाचपुते यांची विद्यार्थ्यांशी चर्चा

एमपीएससी विद्यार्थ्यांकडून आज पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि भूमिका जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे पाचपुते यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा मोर्चा संविधानिक पद्धतीने होत असेल, तर सरकारचा त्याला विरोध नाही. मोर्चाला सरकारने परवानगी दिली असून, तो रद्द करण्याची सरकारची भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT