मुंबई : नरेश कदम
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रम महाराष्ट्रातील काँग्रेससाठी बूस्ट ठरला आहे. गेल्या १२ वर्षांत निस्तेज झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या चेहऱ्यांवर तेज दिसले. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात वातावरण बनविले असून प्रदेश काँग्रेस ॲक्टिव्ह मोडवर आली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेस महाराष्ट्रात पिछाडीवर राहिलेली आहे. जिल्हाजिल्ह्यात काँग्रेस नेत्यांमधील संघर्ष हेही काँग्रेसच्या अधोगतीचे कारण आहे. काही बडे नेते आर्थिक गडबडी लपविण्यासाठी ईडी आणि सीबीआय चौकशीच्या भीतीने भाजपच्या वळचणीला गेले. काही नेत्यांना ही ईडीच्या नोटीस आल्या पण त्यांनी राज्यातील भाजप नेतृत्वाशी जुळवून घेतले.
प्रदेशाध्यक्षपद टाळणारे नेतेही सक्रिय
काही नेते स्वतः भाजपमध्ये गेले नाहीत पण त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना भाजपकडे पाठवले. वर्षभरापूर्वी काँग्रेसचे राज्यातील प्रदेशाध्यक्षपद घेण्यास टाळणारे नेते आता आपल्या मुला-मुलींसह पुन्हा सक्रिय झालेले दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज' कार्यक्रमस्थळी २५ हजार विद्यार्थीनी बसतील इतकी जागा असताना ४२ हजार विद्यार्थीनीनी नोदणी केली. जेन झी , नीट पेपर फुटीचे आंदोलन याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाबद्दल कमालीची उत्सुकता होती. काँग्रेसच्या अपेक्षेपेक्षा हा कार्यक्रम अधिक यशस्वी ठरला. त्यामुळे काँग्रेसला राज्यात संजीवनी मिळाली आहे.
काँग्रेसजनांना आशेचा किरण
काँग्रेसमध्ये आपल्याला राजकीय भवितव्य दिसत नाही म्हणून राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची अनेक घराणी भाजपमध्ये विलीन होत होती. पण आता राहुल गांधी यांचा करिश्मा भविष्यात सत्ता दाखवेल, असा आशेचा किरण काँग्रेसजनांना दिसू लागला आहे.
२ सप्टेंबरला नाशिकला शिबिर
पुण्यानंतर नाशिक येथे जिल्हाध्यक्षांचे शिबिर काँग्रेसने आयोजित केले आहे. या शिबिरात राहुल गांधी २ सप्टेंबरला येणार आहेत. नीट पेपरफुटीपाठोपाठ टीईटी, एमपीएससी पेपरफुटीची मालिका सुरू आहे. असे केंद्र आणि सरकारविरोधातील प्रकरणे आयती काँग्रेसला मिळत आहेत. या प्रकरणानुळे सरकारविरोधात तरुणाई रोष आहे. त्यामुळे काँग्रेससाठी चांगले वातावरण निर्माण होत आहे.
नव्या नेत्यांवर विश्वास
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या. पण त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे काही नेते सत्ता येण्याआधीच मुख्यमंत्रीपदाच्या तोऱ्यात वावरू लागले होते. त्यामुळे जुन्या नेत्यांपेक्षा राहुल गांधी यांचा नव्या आणि निष्ठावंत नेत्यांवर विश्वास असल्याचे काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जात आहे.
घरात बसलेले काँग्रेसचे नेते घराबाहेर पडले
सोशल मीडियाच्या वापर करण्यात भाजप तरबेज आहे. काँग्रेसची सोशल मीडिया यंत्रणा खूप कमकुवत होती पण सद्या काँग्रेसची सोशल मीडियाची यंत्रणा प्रभावी काम करत आहे. भाजपच्या प्रचाराला तोडीस उत्तर देताना दिसत आहे.
तरुणाई ही काँग्रेस पक्षाशी जवळीक साधेल अशी स्थिती नाही त्यामुळे काँग्रेसने राहुल गांधी यांचे फॉलोअर अशी यंत्रणा निर्माण करत आहेत.
राहुल गांधी यांची ‘छात्रों की गूंज' कार्यक्रम आणि केंद्र सरकारच्या विरोधात बेडर भूमिका यामुळे वातावरण तयार झाले असून घरात बसलेले काँग्रेसचे नेते त्यामुळे बाहेर पडले आहेत. आता ते या संधीचा कसा फायदा घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.