Rahul Gandhi Bhiwandi Defamation Pudhari
मुंबई

Rahul Gandhi Bhiwandi Defamation: भिवंडी मानहानी प्रकरणी राहुल गांधी न्यायालयात हजर; नवा जामीनदार निश्चित

महात्मा गांधी हत्येबाबतच्या वक्तव्यावरून दाखल खटल्यात प्रक्रिया पूर्ण; भाजपकडून काळे झेंडे, राजकीय वातावरण तापले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : 2014 मध्ये भिवंडी सोनाळे येथील प्रचारसभेदरम्यान महात्मा गांधींच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी यांनी केले होते. त्यावरून तत्कालीन संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. या खटल्यासाठी राहुल गांधी यांनी शनिवारी भिवंडी येथील न्यायालयात हजेरी लावली.

काँग्रेस नेते शिवराज पाटील-चाकूरकर हे राहुल गांधी यांचे जामीनदार होते. चाकूरकर यांचे निधन झाल्याने आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नवीन जामीनदार बनविण्यात आले आहे. नव्या जामीनदाराची न्यायिक प्रक्रिया राहुल गांधींनी शनिवारी पूर्ण केली, अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील ॲड. नारायण अय्यर यांनी दिली, तर याचिकाकर्ते राजेश कुंटे यांच्या वतीने ॲड. प्रबोध जयवंत यांनी काम पहिले. पुढील सुनावणी 4 एप्रिल रोजी असल्याची माहिती ॲड.प्रबोध जयवंत यांनी दिली. ही प्रक्रिया पूर्ण करून ते मुंबईमार्गे दिल्लीला रवाना झाले.

शनिवारी सकाळी भिवंडी कोर्टात उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी यांचे विमानाने मुंबईत आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मुंबईतील सर्व प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित होते. मुंबई विमानतळावरून राहुल गांधी भिवंडीला रवाना झाले.

यावेळी न्यायालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार रईस शेख यांसह काही प्रमुख काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते, तर संपूर्ण न्यायालय व परिसरात पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपाचा निषेध

मुलुंड टोलनाका परिसरात राहुल गांधी यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले हे अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे सर्वांना माहीत आहे. अशा परिस्थितीत त्यांना काळे झेंडे दाखवणे चुकीचे आहे. याठिकाणी काहीही विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. त्यामुळे सरकारचा व पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांनी दिली. त्यांच्या सोबत उपमहापौर तारिक मोमीन यांनीदेखील या घटनेचा निषेध केला.

राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा -खासदार नरेश म्हस्के

दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय एआय समिट सुरू असताना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशभर

काँग्रेसविरोधात आंदोलन सुरू केले. तसेच काँग्रेसविरोधी आंदोलन ठाण्यात आज शिवसेनेने केले आणि खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधी देशद्रोही असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

भाजयुमो कार्यकर्त्यांनी केला निषेध

दरम्यान, राहुल गांधी रस्ते मार्गे मुंबईहून भिवंडी येथे जात असताना मुलुंड टोल नाका येथे त्यांना भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्ट काढून आंदोलन केले होते. भाजपने राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून त्याचे उट्टे काढण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT