Rabale flyover issue Pudhari
मुंबई

Rabale flyover issue: रबाळे उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर अंधाराचे साम्राज्य

विद्युत रोषणाई व साईन बोर्डच्या अभावामुळे अपघातांचा धोका वाढला

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे येथे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएकडून सुमारे 1.3 किमी लांबीचा उड्डाणपूल सात वर्षांपूर्वी उभारण्यात आला. हा उड्डाणपूल नंतर देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला असला तरी उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

विशेषतः ठाणेकडून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वाराजवळ विद्युत रोषणाई नसल्याने रात्रीच्या वेळी परिसर अंधारमय होत आहे. याशिवाय आवश्यक साईन बोर्ड व दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने वाहन चालकांना मार्गाचा अंदाज येत नाही.

परिणामी प्रवेशद्वारावरील दुभाजकावर वारंवार अपघात घडत आहेत. दोन वर्षांपूर्वी महापालिकेकडून या ठिकाणी तिरंगा पोल बसविण्यात आले होते. मात्र कालांतराने त्यांची अवस्था दयनीय झाली असून देखभालीअभावी तेही निष्प्रभ ठरत आहेत. सध्या प्रवेशद्वार परिसरात अंधार पसरत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने तातडीने विद्युत रोषणाई, साईन बोर्ड आणि दुभाजकावर परावर्तक चिन्हांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या संदर्भात वाहनचालक अनुप आचरेकर यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि स्पष्ट साईन बोर्ड नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांची दिशाभूल होते. त्यामुळे येथे कायमस्वरूपी विद्युत रोषणाई व दिशादर्शक फलक बसवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT